गंभीर - कविता -"अल्पवयीन मुले करिती चोरी, वाढत चाललीय बाल गुन्हेगारी !"

Started by Atul Kaviraje, July 16, 2021, 11:15:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     परवाच यु-ट्यूब वर एक बातमी ऐकली होती, कि तीन अल्प-वयीन मुलांना डोंबिवली पोलीस स्थानकातील पोलिसांनी स्कुटर आणि ऑटो-रिक्षा चोरीच्या प्रकरणात अटक करून, त्यांच्येवर गुन्हा दाखल केला होता . नंतर त्यांच्या वयाकडे पाहून, त्यांचे कमी वय पाहून, कोर्टाने त्यांची रवानगी बाल-सुधार -गृहात केली होती. मुद्दा असा मित्रांनो, कि या वयात ही चोरीची शक्कल या लहान मुलांना सुचते तरी कशी ? शाळेत जायचे, शिकायचे, खेळायचे, मुक्त बागडायचे त्यांचे  वय आणि या वयात त्यांना हे धंदे सुचतात, हे खरोखरच नवलकारी आहे नाही तर काय !

     कदाचित या चुकीच्या कल्पना त्यांना आजचा मीडिया, सोशल नेटवर्क, किंवा आजू-बाजूचे उच्च राहणीमान , एखाद्या सिनेमाची कथा, यातून कदाचित मिळत असाव्यात. इझी मनी, तर सर्वानाच हवा असतो, पण त्याच हा मार्ग नव्हे, आणि या अल्प वयात  तर तो नव्हेच नव्हे. या तीन मुलांनी चोरी करून त्या बदल्यात जो पैसा त्यांना मिळाला त्यातून त्यांनी छान-शौकीचे जीवन जगण्यास सुरुवात केली होती. त्यांना घरूनही हे विचारण्यात कधी आले नव्हते. तर अशी ही बाल-गुन्हेगारी, जगात सर्वत्र फोफावत चालली आहे. या अल्प-वयीन मुलांना, रिमांड  होम मध्ये टाकून फायदा नही, बाहेर आल्यानंतर ते पुन्हा याच गुन्हेगारीच्या क्षेत्रात उतरणार हे नक्की.त्यांचे रीतसर कॉउंसिलिंग होऊन त्यांना योग्य ती दिशा, योग्य तो मार्ग दाखविण्याचे काम हे आपलेच आहे. चला तर मित्रांनो, या मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आताच करून देऊया, जेणेकरून त्यांचे  भविष्यातील जीवन  सुकर होईल, व ते या वाम-मार्गाकडे वळणार नाहीत. ऐकुया  तर या गंभीर समस्येवर आणि वास्तवावर एक कविता. कवितेचे शीर्षक आहे-  "अल्पवयीन मुले करिती चोरी, वाढत चाललीय बाल गुन्हेगारी !"

                               
                अल्प-वयीन मुलांची गंभीर समस्या - कविता

       "अल्पवयीन मुले करिती चोरी, वाढत चाललीय बाल गुन्हेगारी !"
       ------------------------------------------------------


शाळेत जायचे वय ज्यांचे
भविष्य घडण्याचे वय ज्यांचे
खेळण्याचे, हुंदडायचे वय त्यांचे,
बिनधास्त जगण्याचे वय त्यांचे.

मिसरूडही नाही फुटली ओठांवरची
वाळलीही नाही साय अजुनी दुधावरची
कुठून आलीय एवढी अक्कल ?
कुठून सुचलीय त्यांना शक्कल ?

राजरोस करताहेत ही मुले आज चोरी
वयात नाही बसत, पण ही गोष्ट आहे खरी
कुठून शिकताहेत ते हे सारं ?
यापाठी काय आहे सत्य आणि काय आहे खरं ?

सोशल मीडिया चा आहे यात हात ?
की दाखविले जाते हे सारे सिनेमात ?
दुसऱ्यांचे पाहून होते त्याचे अनुकरण ?
आपल्या वयाचे होते त्यांना विस्मरण !

पैश्यापाठी लागलीय सारी दुनिया
आज साऱ्यांनाच हवा आहे "ईझी मनी"
अरे पण वय पहा न तुमचे, पौगंडाचे,
अन मनात भरलेल्या या विषम विचारांचे.

कदाचित मिळत नसावा त्यांना "पॉकेट -मनी"
हवे ते नाही मिळत, असूनही मनी
कदाचित म्हणून उचलले जात असावे पाऊल,
या वयात लागत नाही भविष्याची चाहूल.

दुसऱ्यांचे पाहून हे शिकत असतात
इतरांचे अनुकरण करत असतात
नसते जाणीव पुढल्या येणाऱ्या प्रसंगांची,
अंधानुकरण करत गुन्हेगार होतात.

वयालाही न शोभणारी मुले आज
गुन्हेगारी क्षेत्रात ओढली गेलीत
मोठ्यांनाही लाजविणारी कृत्ये त्यांचेकडून,
सर्रासपणे कळत-नकळत घडून गेलीत.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात,असे म्हणतात
बहुतेक ही त्याची नांदी असावी
ही म्हण होताना दिसतेय खरी,
मोठ्या गुन्ह्याचीच ही प्रथम पायरी असावी.

घरातूनच असावा लागतो धाक आई-वडिलांचा
दिनक्रम ओळखूनच चालावे लागते मुलांचा
एकदा पाय घसरून तो खड्ड्यात पडला,
की कठीण जाते हात देऊन बाहेर काढायला .

पोलिसांच्या डोळ्यातून  दिसते आश्चर्य
या अल्पवयीन मुलांना होते जेव्हा अटक
मनात नसूनही द्यावी लागते शिक्षा,
बाल-सुधार-गृहात द्यावी लागते मग दीक्षा.

उद्याचे भविष्य आजची मुले
देशाचे भविष्य ही अजाण मुले
वेळीच आवर न घातला गेला,
तर भविष्य त्यांचे आहे अंधारलेले.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.07.2021-शुक्रवार.