स्त्री-कविता-अनेक नाती जपणारी स्त्री-"पुरुषाला आज तूच घडवलंस !"

Started by Atul Kaviraje, July 17, 2021, 03:07:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     स्त्री अनेक नाती जपत असते. अनेक नाती  ती घडवत असते. अगदी आजी, पणजी पासून ते थेट आई, बहीण, मुलगी, आत्या, काकी, मामी अश्या अनेक नात्यांनी ती पुरुषाला साथ देत असते. प्रत्येक पावलांबरोबर ती पुरुषाची सावली होऊन चालत असते. कोणत्याही कठीण परिस्थतीत ती त्याला नेहमीच धीर देत असते, त्याला जपत असते. आयुष्याचा प्रत्येक निर्णय ती तितक्याच समर्थपणे पुरुषांबरोबर घेत असते.

     इतके सारे होऊनही ती याचा कुठेही गवगवा करीत नाही. अगदी शांतपणे, धीरोदात्तपणे , सहनशक्तीने तिचे हे कार्य सुरु असते. अश्या या स्त्रीला माझे वंदन असो. प्रस्तुत स्त्री वरील कविता, मी या नाती जपणाऱ्या सर्व स्त्रियांना अर्पण करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे-"पुरुषाला आज तूच घडवलंस !"


                    स्त्री-कविता ( कविता क्रमांक -१ )
                    विषय -  अनेक नाती जपणारी स्त्री
                     "पुरुषाला आज तूच घडवलंस !"
                   -------------------------------


पाठी होतीस खंबीरपणे उभी
कित्येक नात्यांनी, उधळती सुरभी
शक्तीने तुझ्या इतिहास घडविलास,
पुरुषाला आज तूच घडवलंस.

     प्रत्येक नात्यांत तुला पाहिलं
     जे होत अतूट रक्ताचं
     या नात्यातच टिकवलंस शेवटी,
     या नात्यानेच घडवलंस शेवटी.

जन्म दिलास नात्याने माऊलीच्या
झळ उन्हाची थोपवलीस, सावलीने
तुझ्या दुधाने त्यास वाढवले,
ममतामयी प्रेमाचे छत्र धरले.

     बहीण होऊन पाठची सख्खी
     भावास तू कितीदा सावरलेस
     आईसम पाखर घालून मायेची,
     राखीचे नाते अतूट ठेवलेस.

भार्या होऊन पुरुषाची तू
संकटेही झेललीस अर्धांगिनी होऊन
संसाराची दोन चक्रे, स्त्री-पुरुष,
दाखवलेस तू कर्तृत्त्व गाजवून.

     हात देऊन तनयेच्या रूपाने
     मुलासारखे पित्यास वृद्धापकाळी सांभाळले
     प्रत्येक पावलांवर अडखळत चालताना,
     लहान पाऊले होऊन जपले.

थांग नाही प्रेमाचा, हृदयातील
सीमा नाही सागरास, नजरेतील
भाव-भावनांचे नाते सहजी जपलेस,
देवीच्या रूपातच दर्शन दिलेस.

     आज पुरुषाची सावली होऊनही
     नाव तुझे कोठेही नाही
     पुरुषाला घडवताना आज नकळत,
     जग तुला विसरून जाई.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.07.2021-शनिवार.