छंद कविता - "पुस्तकच माझा एकमेव सोबती"

Started by Atul Kaviraje, July 19, 2021, 12:10:48 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     कधी कधी वाटत की आजच्या जगाचे वास्तववादी चित्र बदलावयास हवे, रोज तेच तेच पाहून, ऐकून मन विदीर्ण होत चाललंय, या साऱ्यांचा खऱ्या अर्थाने कंटाळा येऊ लागला आहे. आता प्रकर्षाने अस वाटू लागलंय, की कुठेतरी आपली आवड जोपासावी, आपले मन गुंतवावे, आणी माझं मन रिझवणारा एकच सोबती म्हणजे पुस्तक. कारण तो माझा एक  प्रामाणिक विश्वासू आणी जवळचा मित्र आहे.

      तेव्हा तुम्हीही कुठेतरी आपली आवड जोपासा, त्या आवडीस खत पाणी द्या आणी त्यातून एक वृक्ष घडवा. एक कविता माझ्या या पुस्तक वाचनाच्या छंदावर. कवितेचे शीर्षक आहे  - "पुस्तकच माझा एकमेव सोबती"

                                               छंद कविता
                                               ----------

=================
"पुस्तकच माझा एकमेव सोबती"
=================

उद्याची चिंता आताच कशाला
करमणुकीची साधने नकोत उशाला
जिवलग, सखा, प्राणप्रिय सांगाती,
पुस्तकच माझा एकमेव सोबती.

उफराट्या जगाचा, उलटा कारभार
नाही सु-संगती, नुसताच भ्रष्टाचार
एक-जण दुसऱ्याचे अहितच पहाती,
पुस्तकच माझा एकमेव सोबती.

माहितीचा हा एकमेव जादुगार
ज्ञानाचा हा अथांग सागर
मला नाहीआता,अंधाराचीही भीती,
पुस्तकच माझा एकमेव सोबती.

झालाय प्रेम-भंग, झालंय हृदय-विदीर्ण
दाता माझा, तूच एक-कर्ण
तुझ्याशीच आता जडलीय प्रीती,
पुस्तकच माझा एकमेव सोबती.

या स्वार्थी, भोंदू जगतात
तूच माझा प्रामाणिक साथीदार
आस माझी हीच अंती,
कुणीतरी लिहावी पुस्तक-रूपे आत्म-कथी.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.07.2021-सोमवार.