II श्री विठ्ठल II - कोरोना - वास्तव चारोळया -"दिंडी निघाली एस. टी. ने पंढरपूरला

Started by Atul Kaviraje, July 19, 2021, 10:30:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     या महिन्याच्या  येत्या २०.७.२०२१-मंगळवार रोजी, पंढरपूरला विठ्ठलाचा  "देवशयनी आषाढी एकादशी" चा महोत्सव साजरा होणार आहे. अशी परंपरा आहे कि, वारकरी पंथ या वारीसाठी, प्रत्येक संतांची पालखी आळंदी , देहू आणि अश्याच बऱ्याच देव क्षेत्रांतून खांद्यावर वाहून तिची दिंडी  एका ठराविक ठिकाणी एकत्र  येते, व ते सारे भक्त, वारकरी, विठूचा गजर करीत, माऊलीच्या भक्तीत तल्लीन होतं, टप्प्याटप्याने पायी प्रवास करीत, शेवटी इप्सित स्थळी, म्हणजे पंढरपुरी पोचून, विठ्ठलाच्या पवित्र चरणी आपला माथा टेकवून, त्याच्याशी एकरूप होतात. इथे त्यांच्या वारीची, पर्यायाने दिंडीची सांगता होतं असते.

          पण, आता कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे, सरकारने या पद-यात्रेस किंवा दिंडीस, किंवा वारीस बंदी आणली आहे. सामाजिक अंतर  राखण्याचा कायदा संमत झाल्यामुळे, ही पालखी आता पायी न जाता एस.टी.पंढरपुरी नेण्याचा नियम लागू होतं आहे. सारे वारकरी यामुळे निराश, तर काही ठिकाणी संतापाची लाट उसळत आहे. परंतु सरकारलाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी हे कडक नियम लागू करणे भाग आहे.  त्यामुळे आतापर्यंत न घडलेले असे नवल आज पहाण्यास मिळत आहे. पालखी रस्त्याने न जाता , चक्क बसने पंढरीस चालली आहे. काही वास्तविक, खुमासदार, गंभीर, विनोदाची झाक असलेल्या चारोळ्या मी त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करीत आहे. II  विठ्ठल, विठ्ठल II




                               II श्री विठ्ठल II
                          कोरोना - वास्तव चारोळया 

                    "दिंडी  निघाली एस. टी. ने पंढरपूरला "
                   ------------------------------------
                                     (भाग-१)


(१)
कोरोनाचे प्रस्थ वाढत चाललेय
रस्ते जागोजागी बॅरिअर्सनी अडवलेत
वारकऱ्यांच्या पद-यात्रेस खीळ बसून,
दिंडीचे खांदेकरी बसून राहिलेत.

(२)
पंढरपुरी पांडुरंग वाट पाहतोय
कटेवरी हस्त ठेवून चालत येणाऱ्या भक्तांची
रखुमाई म्हणतेय, काळ बदललाय,
वाट पहा आता फक्त बसची.

(३)
एस.टी.महा-मंडळाच्या फेऱ्या वाढल्यात
आषाढी एकादशी  नजरेच्या टप्प्यात आहे
लाखोंनी वारकऱ्यांची खेप करायची कमी वेळात,
बस वाहक-चालकांना याचेच टेन्शन आले आहे.

(४)
आज पालखी सजली आहे
आज दिंडी निघाली आहे
पण तिला द्यायला खांदा नाहीय आज,
दिमाखात एस. टी. सीटवर ती विराजमान आहे.

(५)
जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल
चिपळ्यांच्या नादात होत होता गजर
आजही आहेत प्रतीक्षेत गावकरी,
घुमणाऱ्या  त्या आवाजाच्या साऱ्या रस्ताभर.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----19.07.2021-सोमवार.