प्राजक्त फुलांची जिवंत - वास्तव-वादी कविता-"ते सळसळण पहावस वाटतंय !"

Started by Atul Kaviraje, July 24, 2021, 11:04:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
     आज  एक  वेगळी  कविता  ऐकवितो . रोजच्या  माझ्या  पहाटेच्या  फिरण्याच्या  वाटेवर  एक  पारिजातकाचे  झाड  लागते . कितीतरी  वर्षे  मी  त्या  झाडाखालून  अनेकदा  गेलो  असेन . वेगळेपण  मला  त्यावेळी  जाणवले  नव्हते , परंतु  जेव्हा  माझी  निसर्गाकडे  पाहण्याची  दृष्टी  बदलली , तेव्हा  मला  हा  प्राजक्त  आपलासा वाटू  लागला  होता , इतक्या  वर्षांपासूनची  त्याची  ती  जवळीक  मला  आज  काहीतरी  सांगत  होती . आज  त्याच्यातील  जिवंतपणा  मला  दिसू  लागला  होता . पण  काही  वर्षांनी  अशी  परिस्थिती  आली  होती  की , सर्व  जागा  भव्य  इमारतींनी  व्यापल्यामुळे , माझा  हा  ओळखीचा  पारिजातक  कुठेतरी  हरवून  गेला  होता . नजरे -आड  झाला  होता . त्याच्या  फांद्याची , पानांची  ती  जिवंत  सळसळ  मला  पुन्हा  ऐकावीशी  वाटत  होती .

   आणि  मग  काय , मित्रांनो , मला  एक  विषय  मिळाला  आणि  या  प्राजक्ताला  पाहून  माझ्या  लेखणीने  एका  उत्स्फूर्त  कवितेला  जन्म  दिला . त्या  प्राजक्ताची , प्रेरणा-दायी , जिवंत , हळुवार  कविता  तुमच्यासाठी  सादर  करतोय . कवितेचे  शीर्षक  आहे -"ते सळसळण पहावस वाटतंय !"


                 प्राजक्त फुलांची जिवंत - वास्तव-वादी कविता
                        "ते सळसळण पहावस वाटतंय !"
               -----------------------------------------


ते सळसळण पहावस वाटतंय
ते सळसळण भिनावस वाटतंय
तो जिवंतपणाचा हिरवा रस,
गात्रागात्रांत शोषून घ्यावासा वाटतोय.

     ती प्राजक्ताची नियमित पखरण
     केव्हातरी अंगावर घ्यावीशी वाटते
     तनुवरील त्या हळुवार स्पर्शासाठी,
     झाडाखालून त्या पुनः पुनः जावस वाटतंय.

डौलदार डोलणाऱ्या त्या फांद्यांमधून
कधी चिवचिवाट ऐकावासा वाटतोय
सळसळत ठेवणारा अवखळ वारा,
कधीकधी अंगावर फिरावासा वाटतोय.

     या गच्च कौन्क्रीटच्या जंगलातून
     प्राजक्ता, तुला शोधण्याचा प्रयत्न करतोय
     एका कटू सत्यास सामोरा जात,
     तू स्वप्नात पुनः पुनः यावासा वाटतोस.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.07.2021-शनिवार.