सुरेश भटांची गझल - "दंगा"

Started by Atul Kaviraje, July 25, 2021, 10:56:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      गज़ल - सम्राट श्री सुरेश भट हे गझलकार म्हणून ओळखले जातात. बऱ्याचश्या अप्रतिम, अर्थपूर्ण गझला त्यांनी लिहिल्या आहेत. "गझल" या विषया-अंतर्गत ऐकुया भटांची एक गझल. गझलीचे बोल आहेत-  "दंगा"   

                   
                             सुरेश भटांची गझल
                               गझल-क्रमांक-१
                                   "दंगा"
                          ---------------------


तू दिलेले दान मी स्वीकारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?

ही तयारी स्वागताची कोणती आहे?
या स्मशानाला तुम्ही श्रृंगारले कोठे?

नेमका माझाच त्यांना राग का आला?
मी कुणाचे नावही उच्चारले कोठे?

एवढी गोडी तुझ्या ओठांत का आली?
गोड का बोले कुणाशी कारले कोठे?

ही पहाटेची बरी नाही तुझी घाई...
चांदणे बाजूस हे मी सारले कोठे?

मी कधी जाहीर केली आसवे माझी ?
दुःख हे माझेच मी गोंजारले कोठे?

मी जरी काही तुझ्याशी बोललो नाही,
आपुले संबंध मी नाकारले कोठे?

हा मला आता नको पाऊस प्रेमाचा
मोडके आयुष्य मी शाकारले कोठे?

'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?


     (साभार आणि सौजन्य-श्री सुरेश भट)
     -------------------------------


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.07.2021-रविवार.