विनोदी-व्यंग्य-कविता -"उमेदवार आलेत निवडणुकीत निवडून, मिरवणूक काढा JCB-त बसवून!"

Started by Atul Kaviraje, July 31, 2021, 11:38:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     माझी प्रस्तुत कविता ही, JCB वर आधारित आहे. तत्पूर्वी  JCB  म्हणजे नेमके काय हे आपण प्रथम जाणून घेऊ. मंडळी, रस्त्यावर खड्डे खोदण्यापासून ते खड्ड्यातील माती ट्रक मध्ये लोड करण्यापर्यंत जेसीबी ची मदत घेतली जाते. पिवळ्या रंगातील मशीन आणि त्याचा तो अवाढव्य पंजा दगड, माती, अवजड सामान इत्यादी अगदी सहज उचलतो. काही वेळा तर या मशीनची भीतीच वाटते. आता ही अवाढव्य मशीन काय आहे हे जर कोणाला विचारलं तर तो सहज म्हणेल, "हा तर 'जेसीबी' आहे." पण मंडळी या मशीनचं नाव 'जेसीबी' का पडलं आणि मुळात या मशीनचं नाव 'जेसीबी'चं आहे का ?

     जे. सी. बी. चा अर्थ आहे 'जोसेफ सिरील बामफोर्ड'. 'जे. सी. बामफोर्ड एक्सावेटर्स लिमिटेड' ही कंपनी जेसीबी नावाने उत्खनन करणारी मशीन विकते. मंडळी ही जी मशीन आपण बघतो ती जगातील पहिली अशी मशीन आहे जिला खरं तर नावच नाव नाही. त्यामुळे मशीनवर दिसणारं कंपनीचा लोगोचं मशीनची ओळख बनला आहे. इथूनच खोदकाम करणाऱ्या या मशीनला 'जेसीबी' म्हटलं जाऊ लागलं.

     जेसीबी हे नावही पूर्णपणे त्या मशीनला दिलेलं नाही. हे नाव त्यात असणाऱ्या इंजिनचं आहे. १९४५ साली जोसेफ सिरील बामफोर्ड यांनी या इंजिनचा शोध लावला. त्यावेळी या इंजिनला नाव काय द्यायचं या बद्दल खूप विचार करूनही एक ठराविक नाव त्यांना मिळालं नाही. शेवटी जोसेफ यांच्या पूर्ण नावाचं संक्षिप्त रूप या इंजिनला आणि मशीनला देण्यात आलं.

          ऐकुया तर कोरोना काळातील JCB  वर आधारित प्रस्तुत विनोदी-व्यंग्य कविता. कवितेचे शीर्षक आहे-  "उमेदवार आलेत निवडणुकीत निवडून, मिरवणूक काढा JCB-त बसवून !"


                 विषय-विजेत्यांची  JCB-त बसवून मिरवणूक
                            विनोदी-व्यंग्य-नवल कविता
     "उमेदवार आलेत निवडणुकीत निवडून, मिरवणूक काढा JCB-त बसवून !"
   ------------------------------------------------------------------



निवडणूक, सहा-माही,दर-साली घेतली जाते
उमेदवाराची इथे कधीच वानवा नसते
उभे राहण्यास नाही लागत त्यांना डिग्री-बिग्री,
तिकिटांची खूप होतेय आजच्या निवडणुकीत विक्री.

उमेदवार निवडणुकीत जोरदार निवडून येतो
पाठून येणाऱ्यांचा भला-मोठा जथा तयार असतो
हे करीन, ते करीन, नुसते वायदेच असतात,
प्रत्यक्ष कार्याचे मृगजळ दूरवरच भासतात.

मिरवणूक भली-मोठी जाते काढली विजयाची
जणू काही सारे जगच जिंकणाऱ्या जेत्याची
साठ-सत्तर भाट, पाठी-पुढे फेर धरीत असतात,
पन्नास सुवासिनी भाग्य-ताट घेऊन औक्षण करतात.

मिरवणूक जायच्या काढल्या पूर्वी वाहनांतून
आताशी मिरवणूक निघतेय चक्क घोड्यावरून
कधी बैल-गाडी, तर कधी ट्रॅक्टर-गाडी,
नाना प्रकार मिरवणुकीचे कुणीतरी शोधून काढी.

यंदाच्या मिरवणुकीत तर आक्रितच घडले
सारे जन पाहून हे अवाकच झाले
सजवले होते JCB - ला फुला-पाना-तोरणांनी,
मढवले होते वर-खाली  विविध पुष्पांच्या माळांनी.

जयजयकार होता सुरु विजेत्यांचा एक-सूरी
दिमाखात होते बैसले विजेते JCB - च्या सीट-वरी
JCB - ला आज मान-सन्मान मिळाला होता,
त्याला तो त्या विजेत्याने मिळवून दिला होता.

JCB आज दिमाखात नटला, मढला होता
पुन्हा नव्याने कोरा पिवळा रंग त्याच्यावर चढला होता
मान वेळावुनी विजेत्यांचे तो आभार मानत होता,
ताठ मान किंचित झुकवून सलाम देत होता.

आठवला त्याला तो तेव्हाचा कठीण काळ
दीड-वर्षांत बांधला होता कोरोनाने त्याच्या पायी चाळ
काम नसल्यामुळे JCB पडला होता धूळ खात,
दातेरी लोखंडी पडले होते सारेच गंज खात.

भू-माफियांनी जमीनच नावाला शिल्लक ठेवली नव्हती
खड्डे बुजवण्याचे,माती-खणण्याची तर काहीच बात नव्हती
काम सारे होते गप्प , धंदे झाले होते सारे ठप्प,
भरावाची, उपसा-उपसीची,खोदकामाची ददातच भासत होती.

पण पुन्हा एकदा JCB - ला नवा जन्म मिळाला
त्याच्या मालकाला याचा आजच शोध लागला
धूळ झटकून उभा राहिला, चाकांवर पुढे चालत राहिला,
नवीन काम मिळाल्याचा आनंद त्याच्या खडखडाटात दिसू लागला.

करमणूक होत होती एकजात साऱ्या बघ्यांची
अजब मिरवणूक JCB - त बसवून निघत होती नेत्याची
काहीतरी नवं-नवीन करून दाखविणारी ही मुंबई-नगरी,
नेत्यांच्या दिमतीस आज JCB देत होती.

पूर्वायुष्य विसरून  JCB भविष्याची वाटचाल करू लागला
विजेत्यांच्या मिरवणुकीला त्याला नेहमीच  CALL येऊ लागला
हेच सन्मानाचे,सुखी,आनंदी आयुष्य त्याला आवडू लागले,
तेव्हाच्या खडतर मेहनतीचे त्याला आज फळ मिळू लागले.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.07.2021-शनिवार.