सुरेश भटांची गझल - "राहिले रे अजून श्वास किती"

Started by Atul Kaviraje, August 01, 2021, 06:00:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      गज़ल - सम्राट श्री सुरेश भट हे गझलकार म्हणून ओळखले जातात. बऱ्याचश्या अप्रतिम, अर्थपूर्ण गझला त्यांनी लिहिल्या आहेत. "गझल" या विषया-अंतर्गत ऐकुया भटांची एक गझल. गझलीचे बोल आहेत- "राहिले रे अजून श्वास किती"


                             सुरेश भटांची गझल
                               गझल-क्रमांक-2
                        "राहिले रे अजून श्वास किती"
                      ---------------------------- 


राहिले रे अजून श्वास किती
जीवना,ही तुझी मिजास किती?

आजची रात्र खिन्न ताऱ्यांची
आजचा चंद्रही उदास किती ?

मी कसे शब्द थोपवू माझे?
हिंडती सूर आसपास किती?

दुःख माझे.. विरंगुळा त्यांचा
मी करावे खुळे कयास किती?

ओळखीचे कुणीतरी गेले..
ओळखीचा इथे सुवास किती?

हे कसे प्रेम? या कशा आशा?
मी जपावे अजून भास किती?

सोबतीला जरी तुझी छाया..
मी करू पांगळा प्रवास किती?


         (साभार आणि सौजन्य-श्री सुरेश भट)
       ----------------------------------- 


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.08.2021-रविवार.