‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "किमया"

Started by Atul Kaviraje, August 12, 2021, 12:10:24 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे  तिसरे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही "मंगेश पाडगावकर" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -"किमया"


                                 कविता पुष्प-तिसरे
                                      "किमया"
                               --------------------


     पावसामुळे वातावरण कसं बदलून जातं याचं चित्रमय वर्णन मंगेश पाडगावकर यांनी 'किमया' या कवितेत केलंय. 'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज त्याच कवितेचा आस्वाद घेऊ या.


उभारून कर उभे माड हे
शिरीं वीरांपरी झेलीत वृष्टी
जरा पहावे क्षितिजावर तर,
बुडून जाते धुक्यात दृष्टी.

हिरवी झाडे - शामल डोंगर
धूसर निळसर तलम हवा ही
लाल गढूळ जलांतून वाहे,
उसळत खिदळत चंचल काही.

भिजून गेलें पंख तरीही
बसला तारांवरती पक्षी
मधेच ठिबके थेंब कोवळा,
फुलवित जळी वलयांची नक्षी.

मिचकावीत केशरी पापणी
कुठे दूरच्या ज्योती हसती
कुठे घरांच्या कौलारांवर,
गुच्छ धुरांचे झुलती...भिजती.

छेडी सुरावट मल्हाराची
धारांच्या तारांवर वारा
लख्ख विजेच्या प्रतिबिंबाचा,
जळात गोठून झाला पारा.

ध्वज मिरवीत काजळी धुराचा
आगगाडी ये दुरून उत्सुक
खडखड धडधड आज तिची पण,
भिजून झाली हळवी नाजूक.


            - कवी-"मंगेश पाडगावकर"
            -------------------------

     (साभार आणि सौजन्य-संदर्भ -बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
   -----------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.08.2021-गुरुवार.