‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’-"गडद निळे"

Started by Atul Kaviraje, August 12, 2021, 11:44:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे चौथे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " बा. भ. बोरकर" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -"गडद निळे"


                             कविता पुष्प-चौथे 
                               "गडद निळे"
                            -----------------


'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज पाहू या बा. भ. बोरकर यांची कविता...


गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले,
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले.

दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे,
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले.

धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले,
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले.

उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले,
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले.

रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे,
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले.

मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे
नवथर रस रंग गहन करिती नयन ओले,
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले.

धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे,
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले.

टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले,
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले.


                  -कवी - "बा. भ. बोरकर"
                  ----------------------

     (साभार आणि सौजन्य-संदर्भ -बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
  ------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.08.2021-गुरुवार.