‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' - "पाऊस"

Started by Atul Kaviraje, August 16, 2021, 07:28:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे आठवे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " विठ्ठल वाघ " यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -" पाऊस "


                                 कविता पुष्प-आठवे
                                      "पाऊस"
                               --------------------

पाऊस
     पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी...ओढ्याची नदीत, नदीची सागरी ..........
     पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी...ओढ्याची नदीत, नदीची सागरी ..........


     'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज पाहू या कवी विठ्ठल वाघ यांची 'पाऊस' ही कविता...


पाऊस असतो तलम पोताचा,
कापुरी कायेचा रेशमी हाताचा...

पाऊस असतो खरा सहोदर,
नभात जाऊन गाठतो सागर...

पाऊस असतो जीवाचा भावाचा,
सुख-दु:खांतून डोळ्यात यायचा...

पावसाची दृष्टी असते सारखी,
पहाड असो वा टेकडी बारकी ...

पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी,
ओढ्याची नदीत, नदीची सागरी ...

पाऊस सोसतो विजांचा सुकाळ,
तरी अमृताचे ओठांत कल्लोळ ...

पावसासारखं कुठं नातं-गोतं ?
काहीच न घेता फक्त राही देत ...

पाऊस रिकाम्या हातानं येईना,
जाताना काहीही घेऊन जाईना...

             - कवी - "विठ्ठल वाघ"
             -------------------- 

       (साभार आणि सौजन्य-संदर्भ -बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
     ----------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2021-सोमवार.