म्हणी - "आंधळे दळते कुत्रं पीठ खाते"

Started by Atul Kaviraje, August 17, 2021, 10:56:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "आंधळे दळते कुत्रं पीठ खाते"

                                     म्हणी
                                क्रमांक - 14
                        "आंधळे दळते कुत्रं पीठ खाते"
                     ------------------------------




14. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते
     ---------------------------

--एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.
--आंधळा माणूस धान्य दळत असेल आणि जवळ बसलेला कुत्रा ते पीठ खात असेल तर त्या कुत्र्याला ओरडणार कोण ? आंधळ्या व्यक्तीमुळे कुत्र्याचा फायदाच होतो . असंच समाजात उच्च पदावरील व्यक्तीला आपली जवाबदारी समजत नसेल तर हाताखालची लोकं त्याचा अवास्तव फायदा घेताना दिसतात .
--आजच्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये म्हण अगदी लागू पडते. जिथे जो खरं काम करतो त्याला किंमत नसते आणि त्याच्या जीवावर भाव कोणीतरी भलताच खाऊन जातो.
--एकाने कष्ट करायचे अन दुसऱ्याने लाभ घ्यायचा
--काम करणार एकजण, पण फायदा उठवणार दुसराच.

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
           ----------------------------------------------   

                          उदाहरणे :-----
                         -----------
                       
     आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते अशी मराठी भाषेत एक म्हण आहे. ही म्हण तंतोतंत महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थेला लागू आहे असे वाटायला लागले आहे. ब्रिटिश कालखंडापासून तयार केलेल्या कालव्यांतील पाण्याला मागणी वाढावी, तिला प्रोत्साहन मिळावे म्हणून कृष्णा, नीरा, प्रवरा, गोदवरी, गिरणा या सारख्या नद्यांतून काढलेल्या कालव्यातील पाण्यातून बारमाही पिके घेण्याला परवानगी देण्यात आली. या परवानगीला अर्थातच बंधन टाकण्यात आले होते. कालव्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या जमिनींपैकी तीसरा हिस्सा जमीन फक्त बारमाही पिकांसाठी वापरली जावी असा नियम करण्यात आला.

     स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र ही मर्यादा खूपच कमी करण्यात आली. बारमाही पिकांना लाभ देण्यापेक्षा जास्त क्षेत्राला लाभ मिळावा, जास्तीजास्त जमीन ओलिताखाली यावी म्हणून दोन, तीन वा जास्तीजास्त ५ टक्क्यापर्यंतच बारमाही पिके कालव्यांच्या पाण्यावर घेतली जावीत अशा प्रकारचे बंधन घालण्यात आले. हे बंधन सिंचन खात्याकडून नव्हे तर कृषी खात्याकडून घालण्यात आले आहे. प्रत्यक्षात आपण काय पाहात आहोत? हे बंधन जाणीवपूर्वक धुडकावून लावण्यात आले आहे. हे बंधन झुगारुन सरसकट ऊस हे पीक लावण्यात आले आहे. हा अतिरेक इतका झाला आहे की असा काही नियम आहे हे सर्वच शेतकरी विसरुन गेले आहेत.

     जसे पुणे, मुंबई सारख्या शहरात बेकायदा बांधकाम फोफावले आहे तशातलाच हा प्रकार आहे. फरक एवढाच की बेकायदेशीर बांधकाम चटकन डोळ्यांना दिसते, हा प्रकार मात्र नजरेआड असतो. ऊस जास्त म्हणून कारखाने जास्त की कारखाने जास्त म्हणून ऊस लागवड जास्त हेच समजानेसे झाले आहे. हे का म्हणून झाले याचे कारण अत्यंत स्पष्ट आहे. शासक, राजकीय पक्ष यांची सोय म्हणून हा सर्व प्रकार घडला आहे. याला दाद मागण्यासाठी कोणी न्यायालयात गेला तर केवढा मोठा स्फोट होईल याची कल्पनाच केलेली बरी.

     याचा परिणाम कशाकशावर झाला हे पाहाणे उद्बोधक ठरेल. प्रमुख परिणाम खालीलप्रमाणे दाखविता येतीलः-----

     १) सिंचनाचा लाभ जास्तीत जास्त लाभधारकांना मिळावा ही अपेक्षा यामुळे पार धुळीला मिळाली आहे. कालव्याच्या तीरावर असलेले शेतकरी पाणी जास्त प्रमाणात घेत असल्यामुळे पाणी दूरवर जातच नाही त्यामुळे कालव्यांचा लाभ फक्त काही शेतकर्‍यांपर्यंतच पोहोचला आहे. सिंचनामध्ये टेल एंडर हा प्रकार असतो. तो टेल एंडर पाण्यापासून वंचितच राहिला.

     २) हे जवळचे लाभार्थी मोकाट सिंचन पद्धतीचा वापर करतात. त्यामुळे पाणी विनाकरण वाया जाते. ते सत्कारणी लागले असते तर एक वेळ त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. पण अशा वापरामुळे ऊस उत्पादन घटते हेही शेतकर्‍यांच्या लक्षात येत नाही. जास्त पाणी म्हणजे जास्त पीक या भ्रमात ते सदैव वावरत असतात. आता तर उसाचे सरासरी उत्पादन एकरी २५-३० टनांपर्यंत खाली आले आहे.

     ३) उत्पादन कमी म्हणजेच उत्पादन खर्च जास्त हे साधे गणित आहे. याच कारणामुळे सरकाराने बांधून दिलेले दर या शेतकर्‍यांना परवडत नाहीत. त्यामुळे दर वाढीसाठी ते आंदोलन करतात. त्यासाठी समाजाला वेठीस धरतात. बसेस जाळतात. रस्ते अडवतात. दोष त्यांचाच असून विनाकारण समाजात अस्वास्थ्य निर्माण करतात.

     ४) ज्यांना हे पाणी मिळायला हवे होते त्यांचेवर यामुळे अन्याय होतो. ते बिचारे पाण्यासाठी तडफडत असतात. एकंदर ऊस उत्पादक शेतकरी किती आहेत हो? एकूण शेतकर्‍यांच्या फक्त तीन ते चार टक्के. पण त्यांच्या दादागिरीमुळे बाकीचे शेतकरी वेठीला धरले जातात. कोरडवाहू शेतकर्‍याला एखादे पाणी जरी मिळाले तरी त्याच्या उत्पादनात चांगली वाढ होवू शकते.

    आपण काय कायदे केले आहेत, काय नियम केले आहेत, त्यांची अंमलबजावणी किती होते हे पाहण्याचा कधी प्रयत्नच केला जात नाही की काय असे वाटायला लागले आहे. त्यामुळे आंधळे दळते व कुत्रे पीठ खाते असे म्हणायचा पाणी आली आहे.


               (साभार आणि सौजन्य -डॉ. दत्ता देशकर)
            ---------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.08.2021-मंगळवार.