‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’- "पड रे पाण्या"

Started by Atul Kaviraje, August 17, 2021, 11:41:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे नववे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " र. वा. दिघे " यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -" पड रे पाण्या "


                                कविता पुष्प-नववे
                                  "पड रे पाण्या"
                              -------------------


     यंदा राज्याच्या अनेक भागांत आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे; पण काही भागांत त्याचे प्रमाण दर वर्षीच कमी असते. पाऊस कमी झाला, तर तिथल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येतं. अशा वेळी आठवते ती रघुनाथ वामन तथा र. वा. दिघे यांची 'पड रे पाण्या' ही कविता. न आलेल्या पावसाला कळकळीनं बोलावणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना ही कविता प्रातिनिधिकपणे व्यक्त करते. 'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज ही वेगळी कविता...


पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी
बघ नांगरलं नांगरलं, कुळवून वज केली,
सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली...

तापली धरणी, पोळले चरणी मी अनवाणी,
पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
निढळावर हात ठेवून वाट मी किती पाहू ?
खिंडीतोंडी हटवाद्या नको उभा राहू !!

वरड वरड वरडिती, रानी मोरमोरिनीं
पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी
पाण्या पड तू, मिरगाआधी रोहिणीचा,
पाळणा रे लागे भावाआधी बहिनीचा !!

आला वळीव खिंडीतोंडी शिवार झोडीत
जाईच्या ग झाडाखाली धनी पाभर सोडित
पड रे पाण्या, पड रे पाण्या, भिजवि जमिनी,
जेवण घेऊन शेतावरी चालली कामिनी !!!

              -कवी - "र. वा. दिघे"
             -------------------

      (साभार आणि सौजन्य-संदर्भ -बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
    ----------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.08.2021-मंगळवार.