" तिसऱ्याचा विनाश होईल संहारक अस्त्रांनी, चौथे युद्ध खेळले जाईल भाल्यानी "

Started by Atul Kaviraje, August 19, 2021, 06:23:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आजच्या कवितेचा ताजा विषय आहे, तालिबान अफगाणिस्थान युद्ध. फक्त १०३ दिवसांत तालिबानने अफगाणिस्थान संसदेवर आपला कट्टर झेंडा फडकविला. २० वर्षांपूर्वी जिचे नामोनिशाणही नव्हते, त्या तालिबानने पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी मूठभर कट्टर इस्लामी सैनिकांना घेऊन, संपूर्ण अफगाणिस्थानावर कब्जा मिळविला आहे. पूर्व राष्ट्राध्यक्ष याना सळो की पळो करून, देश सोडण्यास भाग पडले आहे. आणि आपली  जुलमी राजवट नव्याने प्रस्थापित केली आहे.

     आता पाहूया, पुढे काय घडत ते ? पण या आपापसातल्या द्वंद्वाची खरी झळ पोचली ती या अफगाण सामान्य जनतेलाच. त्यात ती बिचारी होरपळून निघाली आणि  अक्षरशः अफगाण नागरिकाने मिळेल ते विमान पकडून दुसऱ्या देशात स्थलांतर करण्यास सुरुवात देखील केली आहे. हि सत्तेची लालसा, लालचीपण, जमिनीच्या तुकड्यासाठीचे आपापसातील वैर, दुही, बंडाळी-ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाही ना ?

          कारण, देशात जिकडे पाहावे, हा अनाचार, सरकारचे अनागोंदी कारभार, अराजकच दिसून येत आहे. खरं म्हणजे आम्हा जनतेला, सामान्य नागरिकांना युद्ध नकोय, तर शांती बुद्ध हवाय ! एकच प्रश्न आहे, एकाच कळकळीची विनंती आहे, हे स्वांतत्र्य, हे अमान, ही शांती आम्हाला कधी मिळेल ? ते श्वेत कपोत (शुभ्र कबुतर ) कोठे गेले, की जे बऱ्याच वर्षांपूर्वी शांती, अमन, सुख, चैन च्या शोधार्थ गगनाला गवसणी घालण्यास उडाले होते ? कोणाला सापडले तर कळवा बरं का !

     मित्रानो, ऐकुया तर, या युद्धांच्या गंभीर पार्श्वभूमीवर एक वास्तव-वादी कविता. कवितेचे शीर्षक आहे- " तिसऱ्याचा विनाश होईल संहारक अस्त्रांनी, चौथे युद्ध खेळले जाईल भाल्यानी "


                         युद्ध पार्श्वभूमीवर वास्तव-वादी गंभीर कविता
    " तिसऱ्याचा विनाश होईल संहारक अस्त्रांनी, चौथे युद्ध खेळले जाईल भाल्यानी "
   ---------------------------------------------------------------------


उंदीर बिळातून बाहेर पडले
भिंतीना भगदाड पडू लागले
उद्ध्वस्त करीत नाक्या-नाक्यावरील ठाणी,
घरातही शिरू लागलेत ठीक-ठिकाणी.

कालपर्यंत नव्हता ज्यांचा ठाव-ठिकाणा
आज साधताहेत तेच निशाणा
वेड्याचे सोंग पांघरून बुरख्यातले,
ताबा मिळवताहेत होऊन शहाणा.

मूठभर मनुष्यबळ ,सिमित शस्त्रसाठा
अंगात ओतप्रोत भरलीय कट्टरता
बलाढ्य राष्ट्रालाही करून सळो-की-पळो,
अपुली गाजवतोय कठोर सत्ता.

सत्तालोलुप, हाव ही जमिनीची
त्यांना इथवर घेऊन आली
आपल्याच बांधवांशी विश्वासघात करुनी,
त्यांची शीर-कमले कलम केली.

लालची नजरा वर उठताहेत
सत्तेसाठी कोणताही अविचार करताहेत
आमचीच सत्ता, दुसरा नकोय,
उन्मत्त, सत्ताधीश मत्त होताहेत.

आज पुरेपूर ताबा मिळवलाय
दहशत, शस्त्रे, क्रूरतेच्या जोरावर
तैमूरलंगही शरमेच्या होईल आधीन,
क्रूर-कर्मा नवा इतिहास घडवताहेत.

न्यायदेवता डोळ्यांवरल्या पट्टीआडून पहातेय
जुन्या कायद्यांची होळी झालेली
जालीम, कट्टर सत्ताधीशांच्या अतिक्रमणाने,
कठोर कायद्याची नांदी आलेली.

भूभाग पूर्णतः होतोय निर्मनुष्य
दुखावला गेलाय सामान्य मनुष्य
युद्धाची काय होईल परिणती ?
निष्पाप मानवालाच पोहोचतेय क्षती !

कुठे आहे तो श्वेत-कपोत ?
गवसणी घालून गाठतोय टप्पा
गवसेल का त्यास सुख-अमन-चैन ?
नुसत्याच आहेत पोकळ गप्पा !

रक्त-रंजीत क्रांती बास झाली
खेळू नका रक्ताने होळी
नकोय आम्हा हे हिंसक-युद्ध,
हवाय आम्हा तो अहिंसक-बुद्ध.

नवा इतिहास नका रचू
अति झालेत क्रूर-कर्मा इतिहासात
स्वतःच विनाशाचे कारण होऊन,
नामो-निशाण नसेल माणसाचे भविष्यात.

संहार आता दूर नाही
तिसरे-महायुद्ध खेळले जाईल संहारक-अस्त्रांनी
भविष्याची नाहीय  काहीच  ग्वाही,
चौथे-युद्ध खेळले जाईल मात्र, दगडांनी-भाल्यानी.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.08.2021-गुरुवार.