म्हणी - "अडला हरी गाढवाचे पाय धरी"

Started by Atul Kaviraje, August 20, 2021, 10:56:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -  "अडला हरी गाढवाचे पाय धरी"

                                    म्हणी
                                 क्रमांक - 17
                        "अडला हरी गाढवाचे पाय धरी"
                       ------------------------------


17. अडला हरी गाढवाचे पाय धरी
     ---------------------------

--एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
--संस्कृतपर्यायः - वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालविपर्यय:।
-- शहाण्या माणसांनाही वेळप्रसंगी मुर्खांची मनधरणी करावी लागते. प्रसंगानुरूप वागावे.
--एखाद्या काम अडल्यावर मूर्ख लोकांच्याही पायी पडावं लागतं.
--बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीची याचना करू शकतो.
--एखाद्या बुद्धिमान माणसालाही अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
--एखाद्या /बुद्धिवान विद्वान /हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
--अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते. थोडक्यात सत्तेपुढं शहाणपण चालतच नसते याचे सुचक आहे. दिवसातून एकदा तरी आपल्याला गाढवरूपी साहेबासमोर जावेच लागते आणि त्याची गोष्ट ऐकावीच लागते तेव्हा मन शांत करण्यासाठीचा मंत्र- अडला हरी, गाढवाचे पाय धरी.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                ---------------------------------------------- 

                 --उदाहरण क्रमांक - १
                   --------------------

     तर, कृष्णचारित्रात कृष्णाच्या जन्माच्या वेळची एक गोष्ट आहे.

     कृष्ण जन्मानंतर वसुदेव बाळकृष्णाला टोपलीत घेऊन मथुरेच्या कारागृहातून गोकुळात निघालेले असतात. तेव्हा पाऊस तर होत असतोच आणि तुरुंगाचे सगळे पहारेकरी झोपी गेलेले असतात, पण रस्त्यात जाताना वसुदेव बघतो की एक समोर एक गाढव आहे. आता गाढवच ते, रेकल्याशिवाय राहील काय? तर ह्या गाढवाने रेंकू नये, म्हणून वसुदेव अक्षरशः गाढवाच्या समोर डोके टेकतो. जणू सांगायला की बाबा रे, कृपा करून आवाज काढू नकोस, सगळे उठतील. माझेच काम अडले आहे, त्यासाठी तुझ्यासमोर डोके टेकतो.

     म्हणून अडला हरी / नारायण, गाढवाचे पाय धरी...

     संदर्भ:--कर्नाटकात एक अमृतेश्वर मंदीर आहे, (चिकमंगळुर जिल्हा). तिथे काही कृष्णजन्माची शिल्पे आहेत तिथे एक शिल्प आहे, जे ही गोष्ट दर्शविते.

                       --उदाहरण क्रमांक - 2
                        --------------------

     दुष्ट धनगर:-----

     एका गावात एक अतिशय भडक व तापट डोक्याचा धनगर रहात होता. एकदा हा धनगर त्याच्या मेंढीच्या अंगावरील सर्वच्या सर्व लोकर कातरून घेत होता, म्हणून ती बिचारी मेंढी त्या धनगराला विनवणी करून म्हणाली, "धनी, हे थंडीचे दिवस आहेत. या थंडीत मला थोडीशी तरी ऊब मिळावी यासाठी तुम्ही माझ्या अंगावरची सर्व लोकर न काढता, तिचा थोडासा तरी थर माझ्या कातडीवर राहू द्या."

     मेढींचे ते बोलणे ऐकून तो तापट असलेला धनगर अजूनच चिडला व तिला म्हणाला, "मला अक्कल शिकवतेस काय? थांब आता मी देखील तुझ्या लक्षात राहील असा धडा तुला शिकवतो."

     असे म्हणत त्या धनगराने त्या मेंढीचे एक अतिशय कोवळ व लहान असलेले कोकरू दगडावर आपटून ठार मारले. आपल्या कोकराला विनाकारण मारलेले बघून ती मेंढी दुःखाने अजूनच बेभान झाली व धनगराला म्हणाली, "धनी, तुम्ही किती क्रूर आहात! माझ्यावरील राग तुम्ही माझ्या निरपराध असलेल्या लेकरावर काढलात?"

     मेंढीचे ते बोलणे ऐकून तो उलटया काळजाचा धनगर तिला म्हणाला, "मी बघतो आहे की, मी दिलेल्या धडयापासून तू काहीच बोध घेतलेला दिसत नाही; तेव्हा आता तुझे तोंड कायमचे बंद करण्यासाठी, तुझ्यासमोर तुझे दुसरे कोकरूही आपटून मारले नाही, तर मी नावाचा धोंडू नाही."

     धनगराने ती दिलेली क्रूर अशी धमकी ऐकून ती मेंढी आधीच आपल्या लेकराच्या विरहाने दुःखी झालेली होती. तेव्हा ती स्वतःशीच म्हणाली, 'हा क्रूर असलेला तापट डोक्याचा धनगर बोलल्याप्रमाणे वागल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपल्या दुसऱ्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी आपल्याला 'अडला हरी, गाढवाचे पाय धरी' या म्हणीप्रमाणेच वागले पाहिजे.'

     मनाशी असा निश्चय करून ती दुबळी असलेली मेंढी त्या धनगरापुढे आपले मस्तक वाकवून, अतिशय गयावया करीत त्याला म्हणाली, "धनी, खरेच, मीच महामुर्ख असून, आपल्यासारखे चांगले आपणच आहात. तेव्हा खरोखरच मला क्षमा करा व माझ्या दुसऱ्या लेकराला कृपा करून जीवदान द्या."

     मेंढीला आता आपली थोर योग्यता कळून आली आहे असा गैरसमज झाल्याने, त्या धनगराने तिचे ते दुसरे कोकरू मारण्याचे रद्द केले आणि मेंढीचा हेतू साध्य झाला.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.08.2021-शुक्रवार.