II श्रावणी रविवारच्या हार्दिक शुभेच्छा II-(श्रावणी रविवार-लेख)-भाग-१

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 10:11:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     II श्रावणी रविवारच्या हार्दिक शुभेच्छा II
                   -------------------------------------
                             (श्रावणी रविवार-लेख)
                            ---------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी रविवार. ऐकुया तर या दिवसाचे महत्त्व, माहिती, कथा, व्रत आणि पूजा-विधी . मराठी कवितेतील, माझ्या सर्व कवी बंधू आणि कवयित्री भगिनींना श्रावणी रविवारच्या हार्दिक शुभेच्छा.

                                 (माहिती क्रमांक-1)
                               --------------------

    श्रावणी रविवार : कसे करावे आदित्य राणूबाई व्रत? वाचा, महत्त्व व कहाणी:-----
   ------------------------------------------------------------------

     श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराचे महत्त्व अगदी निरनिराळे आहे. श्रावण महिन्यातील रविवारी करण्यात येणारे आदित्य राणूबाई व्रत कसे करावे? या व्रताचे महत्त्व, मान्यता, पूजनविधी आणि कहाणी यांबाबत जाणून घ्या...

                आदित्य राणूबाई पूजन:-----
               ----------------------

     आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो. चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिना हा उपवासांचा, व्रतांचा, उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक वाराचे वेगळे महत्त्व आहे. वारानुसार, त्या त्या देवतांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पति पूजन, जिवतीची पूजा किंवा जरा जिवंतिका पूजन, अश्वत्थ मारुती पूजन याप्रमाणे श्रावणातील रविवारी सूर्याचे पूजन केले जाते. यावेळी आचरल्या जाणाऱ्या व्रताला आदित्य राणूबाई व्रत असे संबोधले जाते. हे व्रत कसे करावे? व्रताची कहाणी काय? जाणून घ्या...

                आदित्य राणूबाई व्रत:-----
               --------------------

     श्रावणातील रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. बाजूला एका वर्तुळात षटकोन काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी माराव्यात. सूर्यचित्र, षटकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा या सर्वांची एकत्रित पूजा करावी. एका सवाष्णीला जेवावयास घालावे. या व्रताच्या दोन कथा आहेत.

                श्रावणी रविवार कहाणी:-----
              ------------------------

     राणूबाई ही सूर्याची पत्नी. तिची पूजा या व्रतात केली जाते. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली. तिला या गोष्टीचा खूप पश्चात्ताप झाला. यानंतर तिने आदित्य राणूबाईची पूजा केली. व्रताचा संकल्प करून आदित्य राणूबाईचे मनोभावे पूजन केले. या व्रतानंतर तिला पुन्हा गतवैभव लाभले. अशा आशयाच्या कथा आढळून येतात.

                     महाराष्ट्रातील विशेष परंपरा:-----
                   --------------------------

     महाराष्ट्रातील खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगलकार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. त्यापैकी ही एक प्रथा म्हणावी लागेल. आपण तुळशीचे, अश्र्वत्थाचे लग्न लावतो. तसे हे आदित्य राणूबाईंचे लग्न म्हणावे लागेल. श्रावण महिना हा उपवासांचा, व्रत-वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. साहजिकच श्रावणी रविवार हा आदित्य-राणूबाईंच्या पूजेसाठी राखला गेला असावा. ज्यांना शक्य असेल, त्यांनी विधिवत हे व्रत करावे. शक्य नसेल, त्यांनी स्नानादी नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईंची मानसपूजा करून गायत्री मंत्रजप करावा.

                    आदित्य पूजन:-----
                   --------------

     आदित्य राणूबाई व्रत करणे शक्य नसल्यास श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारी नाही, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. मात्र, शास्त्रोक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते.


                          (संकलक-देवेश फडके)
                         -----------------------

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
           ------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.