‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "छत्री"

Started by Atul Kaviraje, August 23, 2021, 12:48:54 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे तेरावे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " शंकर वैद्य" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -"छत्री"


                              कविता पुष्प-तेरावे
                                   "छत्री"
                            -------------------


'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज कवी शंकर वैद्य यांची एका वेगळ्याच मूडची 'छत्री' ही कविता...

हा असा पाऊस पडत असताना
तुमच्यासारख्या अनोळखी तरुणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंसं वाटलं...याचं बरं वाटलं..!!
ह्या अशा पावसाच्या वेळी कुणीतरी बरोबर हवंच...!

छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना...
समजुतीने चाललो तर...!
पुढं पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपीतच पावलं टाकायला हवीत.

शक्य असेल तर माझ्या हाताचा..
अं...खांद्याचा आधार घ्या,
म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत रहाल...न पडता,
शिवाय तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल.

मी तुमच्याकडे न पाहताच चाललो आहे खरा...
पण मला कुठूनतरी केवड्याचा वास येतो आहे,
अं.. तुमचं नांव 'केतकी'च आहे, असं मी धरून चाललो आहे.

तुमच्या बोटांतली अंगठी कळत्येय माझ्या खांद्याला;
लक्ष कसं सारखं तिथेच घोटाळतंय...

अरे..!
तुमच्या पोहचण्याचं ठिकाण तर मागेच गेलं.. तुम्ही बोलल्या कशा नाहीत?
अं...माझं काय..?!
अमुक एका ठिकाणी पोहचण्याचा उद्देश नव्हताच माझा.

पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटत्येय,
पण घाबरू नका.. पुढचा रस्ता चांगला आहे!

एक पाहिलंत का?
तुम्ही अगदी नीट चालल्या आहात...माझ्याबरोबर..!
त्यामुळे...छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटत्येय...नाही का..?!!


                  कवी - शंकर वैद्य
                 -----------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
--------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.08.2021-सोमवार.