‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "पाकोळी"

Started by Atul Kaviraje, August 26, 2021, 12:32:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे सोळावे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही "शांता शेळके" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -"पाकोळी"


                               कविता पुष्प-सोळावे
                                    "पाकोळी"
                             --------------------

पाकोळी------

'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज कवयित्री शांता शेळके यांची कविता....


हिरवी झाडी, पिवळा डोंगर
निळी-सावळी दरी
बेट बांबुचे त्यातुन वाजे,
वाऱ्याची पावरी.

कभिन्न काळ्या खडकांमधुनी
फुटति दुधाचे झरे
संथपणाने गिरक्या घेती,
शुभ्र शुभ्र पाखरे.

सोनावळिच्या सोनफुलांचा
बाजुस ताफा उभा
तलम धुक्याची निळसर मखमल,
उडते, भिडते नभा.

हिरवी ओली मखमल पायी
तशी दाट हिरवळ
अंग झाडतो भिजला वारा,
त्यात नवा दरवळ.

डूल घालुनी जळथेंबांचे
तृणपाते डोलते
शीळ घालुनी रानपाखरु,
माझ्याशी बोलते.

गोजिरवाणे करडू होऊन
काय इथे बागडू?
पाकोळी का पिवळी होऊन,
फुलांफुलांतून उडू?


                     कवयित्री - शांता शेळके
                    ----------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ - बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
--------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.08.2021-गुरुवार.