‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "देव अजब गारोडी"

Started by Atul Kaviraje, August 27, 2021, 12:51:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे सतरावे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " बहिणाबाई चौधरी" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "देव अजब गारोडी"


                                  कविता पुष्प-सतरावे
                                  "देव अजब गारोडी"
                                --------------------

देव अजब गारोडी
     आला पिकाले बहार, झाली शेतामधी दाटी...   
     आला पिकाले बहार, झाली शेतामधी दाटी...


निसर्गदत्त प्रतिभा असलेल्या आणि रोजच्या जगण्यातल्या गोष्टी अत्यंत सुंदर शब्दांमध्ये गुंफणाऱ्या कवयित्री म्हणजे बहिणाबाई. 'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज पाहू या बहिणाबाईंचीच एक  छान कविता.

धरत्रीच्या कुशीमधी
बियबियानं निजली
वऱ्हे पसरली माटी,
जशी शाल पांघरली.

बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले वऱ्हे
गह्यरलं शेत जसं,
आंगावरती शहारे.

ऊन वाऱ्याशी खेयता
एका एका कोंबातून
पर्गटले दोन पानं,
जसे हात जोडीसन.

टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनी
जसे करती कारोन्या,
होऊ दे रे आबादानी.

दिसामासा व्हये वाढ
रोपं झाली आता मोठी
आला पिकाले बहार,
झाली शेतामधी दाटी.

कसे वाऱ्यानं डोलती
दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी,
देव अजब गारोडी !


                  कवयित्री - बहिणाबाई चौधरी
                 --------------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
-------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.08.2021-शुक्रवार.