‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "आला आषाढ-श्रावण "

Started by Atul Kaviraje, August 28, 2021, 12:28:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे अठरावे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " बा. सी. मर्ढेकर" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "आला आषाढ-श्रावण "


                                   कविता पुष्प-अठरावे 
                                  "आला आषाढ-श्रावण "
                                 ----------------------

आला आषाढ-श्रावण
     काळ्या डांबरी रस्त्याचा, झाला निर्मळ निवांत...   
     काळ्या डांबरी रस्त्याचा, झाला निर्मळ निवांत...

पूर्वपरंपरेशी नातं सांगणारे नवकवी अशी बाळकृष्ण सीताराम तथा बा. सी. मर्ढेकर यांची ओळख आहे. गोड हिवाळ्याचं वर्णन करणाऱ्या त्यांच्या कवितेइतकीच आषाढ-श्रावणाचं वर्णन करणारी त्यांची कविताही सुंदर आहे. 'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज तीच कविता पाहू या...


आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने,
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत
काळ्या डांबरी रस्त्याचा,
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटें झाली
ओल्या कौलारकौलारीं,
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी
आणि पोपटी रंगाची,
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम
वीज ओशाळली थोडी
धावणाऱ्या क्षणालाही,
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ
येतां आषाढ-श्रावण,
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने,
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.


                      कवी- बा. सी. मर्ढेकर
                     ---------------------


  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
--------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2021-शनिवार.