‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "पावसाचे गाणे"

Started by Atul Kaviraje, August 30, 2021, 12:02:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे विसावे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " श्रीधर बाळकृष्ण रानडे" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "पावसाचे गाणे"


                              कविता पुष्प-विसावे
                                "पावसाचे गाणे"
                            --------------------


पावसाचे गाणे--

'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचे 'पावसाचे गाणे' ...

उघड पावसा ऊन पडूं दे,
उडूं बागडूं हंसूं खेळुं दे !

कळी उमलुं दे फुला फुलूं दे
पानें वाऱ्यामध्यें डुलूं दे
टपटप खालीं थेंब पडूं दे,
तालावर त्या मला नाचुं दे ! ।।१।।

पाय उठवुं दे वाळूवरती   
समुद्र झाला ! आली भरती
आभाळ पडे खोल खालतीं,
डोकावुनि ढग आंत पाहुं दे ! ।।२।।

उंच चालल्या घारी वरतीं
बगळे रांगा धरुनी उडती
ढगांत भरभर रंग बदलती,
पाठशिवणिचा खेळ बघूं दे ! ।।३।।

चिमणी ओले पंख सुकविते
घरट्यामधुनी पिलूं पहातें
मुंगी रांगेमधें धांवते,
साखर-खाऊ तिला घालुं दे ! ।।४।।

जाळीं कोळ्यांची बघ भिजती
हिऱ्यासारखे थेंब चमकती
रंग त्यावरी सुंदर खुलती,
थांब पावसा हार करूं दे ! ।।५।।

बसे फुलावर फूलपांखरूं
मला सांगतें मौज चल करूं
थांब पावसा ऊन पडूं दे,
गातां गातां मला खेळुं दे ! ।।६।।


                 कवी - श्रीधर बाळकृष्ण रानडे
               ----------------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
--------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2021-सोमवार.