‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "वर्षाकाल"

Started by Atul Kaviraje, September 06, 2021, 12:19:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे सव्वीसावे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही "परशुरामतात्या गोडबोले" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "वर्षाकाल"


                                कविता पुष्प-सव्वीसावे
                                      "वर्षाकाल"
                               --------------------

वर्षाकाल--
   
'कवितांचा श्रावण, श्रावणाच्या कविता'मध्ये आज परशुरामतात्या गोडबोले यांची 'वर्षाकाल' ही रचना. प्रत्येक कडव्याची वेगळ्या वृत्तात केलेली मांडणी आणि उपमा अलंकाराचा प्रभावी वापर हे या रचनेचं वैशिष्ट्य.

(वसंततिलका)
हा मेघ आर्द्रमहिषोदरतुल्य काळा,
शंखाकृती धरि करांत बलाकमाळा;
विद्युत्प्रभा वसन पीत कसोनि हातें,
वाटे दुजा हरिच आक्रमितो नभातें ॥१॥

(शार्दूलविक्रीडित)
भासे कौरवराष्ट्रतुल्य नभ हें जें अंधकारा धरी,
हर्षानें बहु गर्जना करी शिखी दुर्योधनाचे परी;
द्यूतीं निर्जित धर्मसा पिक वनीं आला असे संप्रती,
गेले स्त्रीसह हंसपांडव तसे अज्ञातवासाप्रती ॥२॥

धाराजर्जर दर्दुर प्रसरती पंकीं उड्या घालिती,
झाले मोर विमुक्तकंठ, फुललीं झाडें पहा डोलती;
साधूला खळमंडळी तशिच ही चंद्रास मेघावळी,
झांकी; ती कुलटेसमान चपला राहे न एके स्थळी ॥३॥

(आर्या)
तो मेघराज नेतो हरुनि नभी करसमूह चंद्राचा,
राजा जसा स्वनगरा नेतो कारभार अबल शत्रूचा ॥४॥

(शार्दूलविक्रीडित) 
मेघीं आर्द्रतमालपत्रमलिनीं आकाश आच्छादिलें
बाणीं हस्तिस तेंवि वारुळशता धाराशतें भेदिलें;
शोभे वीज वनावरीहि, दिवटी प्रासादमाथां जशी,
चंद्राची हरिली प्रभा जलधरे स्त्री दुर्बलाची तशी ॥५॥

(उपजाति)
विद्युल्लतांनी जळतेंच काय?
धाराजळांनी गळतेंच काय?
बलाहकांनी हंसतेंच काय?
वायुभ्रमें नि:श्वसतेंच काय? ॥६॥

ताडावरी कर्कश शब्द होतो,
जळीं स्थळीं केवळ मंद हो तो;
जशा विण्याच्या झडतात तारा,
तालानुसारे पडतात धारा ॥७॥

                 कवी - परशुरामतात्या गोडबोले
              --------------------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
--------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.