‘कवितांचा श्रावण, श्रावणाच्या कविता’-"सुंदर साजिरा श्रावण आला"

Started by Atul Kaviraje, September 08, 2021, 12:11:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे अठ्ठाविसावे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " कुसुमाग्रज " यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "सुंदर साजिरा श्रावण आला"


                                   कविता पुष्प-अठ्ठाविसावे
                                 "सुंदर साजिरा श्रावण आला"
                                --------------------------


सुंदर साजिरा श्रावण आला...

'कवितांचा श्रावण, श्रावणाच्या कविता'मध्ये आज कुसुमाग्रजांची कविता...


हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला.

तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला,
मेघांत लावीत सोनेरी निशाणे, आकाशवाटेने श्रावण आला.

लपत छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला,
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला.

लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला,
सृष्टीत सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला.


                     कवी- कुसुमाग्रज
                    -----------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
-------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.09.2021-बुधवार.