II गौरी-गणपती शुभेच्छा II-गौराई गाणी क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 10, 2021, 07:11:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II  गौरी-गणपती शुभेच्छा II
                                    गौराई गाणी क्रमांक-१
                               ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक- १२.०९.२०२१-रविवार रोजी गौरी चे आगमन होत आहे, दिनांक-१३.०९.२०२१-सोमवार रोजी तिचे साग्रसंगीत पूजन होऊन, दिनांक-१४.०९.२०२१-मंगळवार रोजी, गणेश मूर्ती सह तिचे विसर्जन होणार आहे. मराठी कवितेच्या सर्व कवी आणि कवयित्री, बंधू-भगिनींस गौरी-गणेशाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकुया, गौराईच्या आगमनाप्रीत्यर्थ काही गाणी.

     गणेशाची आई गौराई म्हणजे माहेरपणासाठी आलेली माहेरवाशीण; प्रत्यक्ष पार्वती! तिला लवकर येण्याचं आवाहन, आणि आल्यानंतरचं तिचं आगत-स्वागतही काही पारंपरिक गाण्यांमधूनच केलं जातं.
     
     शहर असो वा ग्रामीण भाग, गौरी-गणेशाचा सण म्हणजे... उत्साहाला उधाण! त्यातही अधिक तयारी गणेशासाठी सजावट-आराशीची, तर गौराईसाठी नागपंचमीपासूनच झिम्मा-फुगड्यांची! कारण गणेशाची आई गौराई म्हणजे माहेरपणासाठी आलेली माहेरवाशीण; प्रत्यक्ष पार्वती! तिला लवकर येण्याचं आवाहन, आणि आल्यानंतरचं तिचं आगत-स्वागतही काही पारंपरिक गाण्यांमधूनच केलं जातं. वास्तविकतः अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन, म्हणजे गौराई असते अवघ्या तीन दिवसांची पाहुणी. आणि त्यामुळेच तिचं कौतुकही न्यारंच. वेगवेगऴ्या रीतिरिवाजांनुसार पूजन, गोडधोडाचा नैवेद्य आणि 'दिवा जळं दिवाटी गं, कापराच्या वाती, आली गवराई पावणी गं, खेळू साऱ्या राती...' असं म्हणत झिम्मा-फुगड्या घालत रात्रीच्या रात्री जागरणं...पण वाढत्या शहरीकरणात आणि धकाधकीच्या जीवनात अलीकडे या गाण्यांचा काहीसा विसर पडल्यासारखा वाटतो. तो पडू नये, आणि गाण्यांशिवाय, सण 'सजलेला' असला तरी 'सुना सुना' राहू नये.

      गौराईचं कौतुकच न्यारं... गौरी गणपतीच्या गाण्यांचा खजिना-----


                                    गौरी गणपतीची गाणी :
                                   1. गाणे : सूर्य उगवला...
                                 ------------------------
                               

गाण्याचे बोल :-----


सूर्य उगवला ठाण्याला, चंद्रभागेच्या कोन्याला

मी पाहते चंद्राला, पदर माझ्या खांद्याला

बंधू आलेत न्यायला, रजा नाही जायाला

रजा नाही जायाला, पंचमीच्या सणाला

या घरचा उंबरा गं, कधी मला सुटंल

बाप माझा विठ्ठल गं कधी मला भेटंल- १


मी पाहते चंद्राला, पदर माझ्या खांद्याला

बंधू आलेत न्यायला, रजा नाही जायाला

रजा नाही जायाला, गवरीच्या सणाला

या घरचा उंबरा गं, कधी मला सुटंल

आई माझी रुक्‍मिणी गं, कधी मला भेटंल- २


मी पाहते चंद्राला, पदर माझ्या खांद्याला

बंधू आलेत न्यायला, रजा नाही जायाला

रजा नाही जायाला, दसऱ्याच्या सणाला

या घरचा उंबरा गं कधी मला सुटंल

भाऊ माझा पुंडलिक कधी मला भेटंल- ३


                                    गौरी गणपतीची गाणी :
                                  2. कारल्याच्या वेलाखाली...
                               ---------------------------

गाण्याचे बोल :-----


कारल्याच्या वेलाखाली का गौरी उभीशी

जोडव्याचे जोड सांडलं काय करू मामाजी

सांडलं तर सांडू दे, तुजं न्हवं बापाचं

करून देईन लाखाचं, चल गौरी घराशी- १


भोपळ्याच्या वेलाखाली का गौरी उभीशी

पैंजणाचं जोड सांडलं काय करू मामाजी

सांडलं तर सांडू दे, तुजं न्हवं बापाचं

करून देईन लाखाचं, चल गौरी घराशी- २


वाळकीच्या वेलाखाली का गौरी उभीशी

पाटल्याचं जोड सांडलं काय करू मामाजी

सांडलं तर सांडू दे, तुजं न्हवं बापाचं

करून देईन लाखाचं, चल गौरी घराशी- ३


                            (संकलन : सुजाता पाटील)
                       
                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ सकाळ.कॉम)
              --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2021-शुक्रवार.