दुष्काळ...

Started by hopeless_wonderer97, September 14, 2021, 11:54:51 AM

Previous topic - Next topic

hopeless_wonderer97

पाहिलं म्या माह्या बापाचं निर्जीव झालेलं शरीर, झाडाच्या फांदीला टांगलेलं,
त्याच झाडाच्या फांदीला ज्यावर म्या सुरपारंब्या खेळायचो,
भलं उदास वाटतं होतं ते, थकलं असावं बहुतेक लटकून लटकून.
होता माहा बाप शेतकरी स्वाभिमानी, फेडायचं होतं त्याला सावकाराचं कर्ज,
पण हा वरून मात्र कोपला, नाही फुटला त्याला पान्हा,
म्या मात्र झालो पोरका, कायमचा माह्या बापाला...

पाहिलं म्या माह्या मायेचं उजाड झालेलं कपाळ, नि राया गेलेला तिचा विरान देह,
होती माझी माय समदं समजून घेणारी जणू विठ्ठलाची रखुमाईचं,
पण करितो मी विचार या रखुमाईच्या इतक्या फाटक्या नशिबाचा, मग वाटतो मला तो विठ्ठलचं खोटा,
विठ्ठल तर गेला पण रखुमाईचं जिवंत मड मात्र जाळायचं विसरला...

पाहिलं म्या माहं वाळवंट झालेलं गावं, ती ओसाड झालेली गावची पार,
ते पशुहूनही लख्तर झालेलं माणसाचं जगणं,
ते जीव घेणारं ऊन नि ती पाण्यावाचून भेगळालेली भुई,
शेतासारखचं आयुष्य पण भेगाळून गेलयं नि उन्हासारखीचं आयुष्याची आगं मनाला आतून जाळत सुटलीय,
कशातचं काहीच अर्थ घावेना, जगावं की मरावं हेचं कळेना...

पाहिली म्या आईला पाना फुटला नाही म्हणून रडून रडून उपाशी झोपलेली तान्ही लेकरं नि त्या आयांच्या जिवाचा झालेला आकांत,
प्यायला पाणी नाही म्हणून तडफडणारी गुरढोरं नि म्हातारीकोतारी माणसं,
आयुष्याचा हा तमाशा पाहून पाहून मी थकलो, त्या विरान ओसाड गावातचं भटकतं राहिलो...

पाहिली म्या काही माणसं, जी असतात मेलेल्या जनावरांवर जगणाऱ्या गिदाढासारखी,
त्यांना पाहून वाटलं, द्यावा एक शेवटचा लढा अजून एकदा, शेवटच्या श्वासापर्यंत,
नि करावं मर्दन त्यांचं, व्हावं सवताही जळून राख त्या रक्ताच्या आगीत,
हीच होईल खरी सेवा ह्या पुंडलिकाची त्या विठ्ठल-रखुमाईच्या पाईत....

आता माह्या डोळ्यात आसवही नाही येत जीव मोकळा करायला,
त्यान्हीही माही साथ सोडली असावी पण हा जीव काही साथ सोडेना नि घुसमटल्यावाचून पण काही राहीना,
त्याची ही श्वासासाठीची घालमेल एकदाची संपावी नि व्हावं त्यानं कायमचं मुक्त,
पण त्या रखुमाईत मात्र ह्या पुंडलिकाचा जीव गुंतून पडला...
••••••
शुभम तावरे