‘जागतिक नदी दिन’ - लेख क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, September 25, 2021, 01:50:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      'जागतिक नदी दिन'   
                                          लेख क्रमांक-1
                                    ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२५ .०९ .२०२१ -शनिवार  आहे. आजचा दिवस हा "जागतिक नदी दिन" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिनाचे महत्त्व, आणि इतर माहिती.


              September 25-World Rivers Day

To highlight the many values of rivers and to increase public awareness and hopefully encourage the improved stewardship of rivers around the world.


सप्टेंबर महिन्यातला शेवटचा रविवार हा 'जागतिक नदी दिन' म्हणून साजरा केला जातो.

     जागतिक नदी दिन गेल्याच आठवडय़ात येऊन गेला. जगातल्या साऱ्या नद्यांसाठीचा हा दिवस; पण नदी राखण्याचं काम तर रोजचंच! हे काम करणाऱ्या अनेक संस्था जशा परदेशामध्ये आहेत, तशाच भारतात.. महाराष्ट्रातही आहेत! त्यांच्यामुळेच तर जागतिक नदी दिन आणि भारतीय नदी सप्ताहसुद्धा खऱ्या अर्थानं 'साजरा' होतो..

     सप्टेंबर महिन्यातला शेवटचा रविवार हा 'जागतिक नदी दिन' म्हणून साजरा केला जातो. याच नेमक्या दिवसाला खास औचित्य असे नाही. आपल्या देशात जिथे अनेक नद्यांचे वाढदिवस साजरे होतात, नर्मदेचा, गोदावरीचा, कावेरीचा, गंगेचा, तिथे या दिवसाचे असे काय महत्त्व? आणि तरीही जगातल्या नद्यांसाठी एक खास दिवस असणे लोभस आणि सकारात्मक. आजूबाजूला करोनाची छाया हटत नाही, विदीर्ण करणाऱ्या बातम्या रोज कानावर येतात, असे असताना आजूबाजूला घडणारे शुभंकर उघडय़ा डोळ्याने बघणे, मनात साठवणे महत्त्वाचे. जागतिक नदी दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव देणारे मार्क अँजेलो यांनी ब्रिटिश कोलंबियामधल्या अनेक नद्या स्वच्छ आणि सुडौल केल्या. त्यांचे एक वाक्य लक्षात राहिले, ''कोणतीही नदी वाचवण्याच्या पलीकडे गेलेली नाही.'' मात्र परदेशात अभ्यासामुळे, अनेक वर्षे चाललेल्या सरकारी आणि बिगरसरकारी फंडिंगमुळे हे काम तुलनेने सोपे. आपल्या सीना, मुठा, मिठी, उल्हास, वालधुनीबद्दल आशादायी असणे अवघड. आणि तरीही किती तरी गट सरकारी पैशाशिवाय, समाजाच्या फारशा मदतीशिवाय, पब्लिसिटीशिवाय काम करीत आहेत. या गटांचे काम समजून त्याचे कौतुक करणे हे आपल्यासाठीच गरजेचे.

     या वर्षांत नद्यांबद्दल चांगले काय घडले? अनेक गटांबरोबर चर्चा केली असता सगळ्यांचे पहिले उत्तर, 'तसे तर काहीच नाही.' पण त्यांनी सांगितलेल्या कामांची यादी ऐकली तर लक्षात येते की मोठे काम होते आहे, ज्याचे फळ नक्कीच मिळणार. पर्यावरण आणि गव्हर्नन्समधल्या कामांचे परिणाम वर्षांनुवर्षे दिसत नाहीत, ते समजून घेणेदेखील अवघड, पण हलक्या पावलांनी बदल घडतोय. पुण्याच्या 'जीवितनदी' संस्थेने आजवर दहा हजार विद्यार्थ्यांना नदीकाठी नेऊन नदीच्या गोष्टी, इतिहास, भवतालाची ओळख करून दिली आहे. यांच्या रेटय़ाने रामनदी-मुळेच्या संगमावर मैलापाणी केंद्र जास्त परिणामकारकरीत्या काम करतंय, तिथले मासेमार पाण्याच्या गुणवत्तेबद्दल बोलू लागले आहेत. इंद्रायणी नदीवर देहूजवळ स्थानिकांचा गट माहसीर मासे वाचवत आहे, नदी साफ करत आहे, आपल्या भाषेत ठामपणे शासनाशी बोलत आहे.

     नवी मुंबई विमानतळासाठी चार नद्यांचा मार्ग बदलण्याचे घाटत असतानाच मोठा पूर आला आणि नद्यांनी आपल्या भिंती सोडून ट्रक, डम्पर बुडवले. मुंबईतील 'वनशक्ती'सारखे गट या विरोधात कोर्टात जात आहेत, अत्यंत दमवणारे आणि सातत्य लागणारे संघर्ष करीत आहेत. त्यांना तरुणांचा विलक्षण पाठिंबा मिळत आहे. गेल्या वर्षी शेकडो विद्यार्थ्यांनी अनेक महिने परिश्रम केले आणि ते मिठी नदीचा फक्त अर्धा किलोमीटर भाग साफ करू शकले अशी नदीची परिस्थिती. नदी एकदा साफ करून काहीच होत नाही वगैरे ठीक आहे; पण पहिले पाऊल छोटेच असणार. विदर्भातील 'भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळा'ने मनीष राजनकर यांच्या नेतृत्वाखाली ४३ गावांतील ६३ तलाव खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवित केले. पुनरुज्जीवन म्हणजे भसाभस जेसीबी घालून तळ खरवडणे नसून 'जीवन' समजून काम करणे. पाण्यावर फक्त शहरांचा आणि शेतीचाच हक्क नसून मासेमारदेखील पाणी वापरतात, आपण त्यांना विसरलो तरी. इथल्या स्थानिक तलावाचे मत्स्य उत्पादन १०० किलोपासून ६०० किलोवर गेले, पाण-वनस्पती, गाळ, पाणी, धीवर यांची भाषा ऐकून हे काम झाले, निव्वळ सरकारी हुकमावरून नाही. २०१९ चा पूर ओसरल्यानंतर अनेक हातांनी पंचगंगा नदी साफ झाली. कोकणातल्या धामापूर गावात वसलेल्या 'सीमान्तक' संस्थेने लोकसहभागाने पाणथळ जागांचा अभ्यास कसा करायचा आणि त्यांना त्यांचे संवर्धन कसे करायचे याचा परिपाठच घालून दिला. असे करताना जवळपासच्या गावांतली हुशार आणि कर्ती फौजच तयार केली.

--परिणीता दांडेकर
  ----------------

    (लेखिका 'साउथ एशियन नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल' या 'ना नफा' संस्थेसाठी काम करतात.)


                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता .कॉम)
                     -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.09.2021-शनिवार.