II शुभ दिवाळी II-"धनत्रयोदशी"

Started by Atul Kaviraje, November 02, 2021, 12:53:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II शुभ दिवाळी II
                                           "धनत्रयोदशी"
                                      -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०२.११.२०२१-मंगळवार आहे. शुभ दिवाळीची सुरुवात होत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनीस दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आजचा मंगलमय दिवस  म्हणजे "धनत्रयोदशी". वाचूया, या दिनाचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, व्रत, आणि इतर महत्त्वाची माहिती.

          धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती आणि पूजा विधी---

     वसुबारस म्हणजेच गोवत्स व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस धनत्रयोदशी ज्याला धनतेरस देखील म्हटल्या जाते!

     अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येणारा हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणुन देखील साजरा करण्याची प्रथा आहे.

                  धनत्रयोदशी ची पूजा विधी---

     या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वहयांची पुजा करून त्यांचा वापर करण्यास सुरूवात करतात. या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पुजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते.

     घरातील दागदागीने तिजोरीतुन बाहेर काढुन ते आजच्या दिवशी स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात. आजच्या दिवशी नव्या कपडयांची आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ समजल्या जाते.

           धनतेरस (धनत्रयोदशी) ची कथा---

       धनत्रयोदशी दिवस साजरा करण्यामागे काही कथा सांगितल्या जातात...

     ज्यावेळी इंद्रदेवाने असुरासमवेत समुद्रमंथन केले त्यावेळी त्यातुन देवी लक्ष्मी प्रकट झाली त्यानंतर सागरातुन अमृतकुंभ घेउन धन्वंतरी प्रकटले म्हणुन या धनत्रयोदशीला धन्वंतरीची पुजा करण्याची पध्दत आहे. या दिवसाला "धन्वंतरी जयंती" (Dhanvantari Jayanti) असेही म्हंटले जाते.

     धन्वंतरी यांना भगवान विष्णुचा अवतार समजल्या जातं. सर्व वेदांमधे ते निष्णात होते, मंत्र तंत्राचे ते उत्तम जाणकार होते त्यांच्या अलौकीक सामथ्र्यामुळे अमृतरूपाने अनेक औषधींचे सार देवांना प्राप्त झाले आणि म्हणुनच धन्वंतरींना देवांचे वैद्यराज म्हंटल्या जातं. तिन्ही सांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दिर्घायुष्याचा लाभ मिळतो अशी मान्यता आहे.

                  दुसरी कथा म्हणजे...

     हेमराजाचा सुपुत्र वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. या भविष्यवाणीमुळे राजा राणी फार चिंतीत असतात. आपल्या मुलाने आयुष्यात सर्व सुखं उपभोगावीत आणि तो दिर्घायु व्हावा अशी राजा राणीची ईच्छा असते.

     राजपुत्राचा विवाह करण्यात येतो, भविष्यवाणी प्रमाणे विवाहाच्या चौथ्या दिवशी राजपुत्राचा मृत्यु निश्चित असतो. त्या रात्री राजपुत्राची पत्नी त्यास झोपु देत नाही. संपुर्ण शयनगृहात दिवे लावले जातात. राजपुत्राच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या भरपुर मोहरा ठेवल्या जातात आणि प्रवेशव्दार देखील सोन्या चांदीच्या दागिन्यांनी पुर्ण भरले जाते.

     राजपुत्राची पत्नी त्यास अनेक गोष्टी आणि गाणी सांगत त्याला जागे ठेवते. यमराज ज्यावेळी सापाचे रूप घेउन राजपुत्राच्या खोलीत प्रवेश करतात त्यावेळी या दागदागिन्यांनी आणि दिव्यांनी त्यांचे डोळे दिपतात आणि राजपुत्र त्यांच्या दृष्टीस पडत नाही त्यामुळे ते आपल्या यमलोकात परततात. राजपुत्राचे प्राण वाचतात या दिवसाला यमदीपदान असेही म्हंटले जाते.

     धनत्रयोदशीला दिवे लागणीच्या वेळी घराबाहेर एक दिवा लावुन त्याचे टोक दक्षिण दिशेला करून त्यास नमस्कार करावा यामुळे अपमृत्यु टळतो असा समज आहे.

     शेतकरी आणि कारागिरी आजच्या दिवशी आपापल्या कामाच्या संबंधीत अवजारांची पुजा करतात. तिफन, नांगर, कुळवाची पुजा केली जाते. शेतकरयांसाठी शेतातुन घरात आलेलं धान्य म्हणजेच लक्ष्मी त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पुजा करतात. धणे आणि गुळाचा नैवेद्य दाखविल्या जातो.

     सगळीकडे पणत्या लावुन झगमगाट आणि रोषणाई केली जाते. दिपावली हा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सण आहे. सर्वजण एकत्र येउन हा पाच दिवसांचा उत्सव मोठया आनंदाने साजरा करतांना दिसतात.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.11.2021-मंगळवार.