धडपड जगण्याची ??

Started by Ashok_rokade24, November 10, 2021, 10:42:04 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

भय मृत्यूचे जरी इथे वाढले ,
जगण्याची धडपड सुरू आहे |
कुणी मरणा पासून दूर पळे , 
कुणी रोज मरून जगतो आहे ॥

भाव अति वाढले इथे सार्‍यांचे ,
माणसांची किंमत घटली आहे |
जाति धर्मात माणूस हरवला ,
कुणी माणुसकीच्या शोधातआहे ॥

अन्नासाठी करी कष्ट रात्रंदिन ,
परि निसर्ग असा कोपला आहे |
हात जोडून हताश होऊन ,
अन्नदाता आसवे ढाळीत आहे  ॥

शाळेची बंद झाली सारी कवाडे ,
भविष्य बाळांचे अडकले आहे |
नोकरीविना परिवार भुकेला ,
लांडगे लचके तोडीतच आहे ॥ 

भरल्या पोटी कुणी खाई तुपाशी ,
अन्नाविणा कुणी उपाशीच आहे |
चिंता नसे इथे कुणाची कुणाला ,
जगण्याची धडपड सुरू आहे ॥
जगण्याची धडपड सुरू आहे ॥

अशोक मु. रोकडे .
मुंबई .