रात्र थोडी , सोंगे फार !!

Started by Ashok_rokade24, December 01, 2021, 04:23:36 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

करण्याचे राहीले बरेच काही ,
भान समयाचे ऊरलेच नाही ,
काळ बदलला वेळही सरली ,
सोंगे फार रात्र थोडीच राहीली ॥

गोतावळा हा सभोवती जमला ,
कोलाहल सदैव कानी घुमला ,
गुंजारव भ्रमरांची बागेतली ,
कोलाहली न कधी ऐकता आली ॥

बंध हळूवार रेशमी नाजूक ,
ओढ जिवाला वाटे आपसूक ,
परि नकळत साथ ही सुटली ,
साद अंतरीची अंतरी राहीली ॥

अवजडओझेआयुष्य दबले ,
क्षण आनंदाचे हरवून गेले ,
डोळ्यातआसवांची दाटी झाली ,
अंधार दाटला वाट हरवली ॥

शोधात सुखाच्याआयुष्य सरले ,
सुख जे हवे ते कधी न पाहीले ,
आता मिळण्याची चिंता न ऊरली ,
नकोआता काही रात्र थोडी राहीली ॥

अशोक मु. रोकडे .
मुंबई .