जिंदगीच्या रानामंदी.......

Started by SHASHIKANT SHANDILE, December 30, 2021, 10:37:15 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

जिंदगीच्या रानामंदी रोप काय लावू रे
सांग देवा पेरणीला भोग काय दावू रे

विना दान दक्षिणा तू
पावतांना दिस ना
नशिबाला पाणी नाही
जिंदगीला कस ना

सांग देवा निंदणीला कुठं तरी जाऊ रे
जिंदगीच्या रानामंदी रोप काय लावू रे

गाळून झाला घाम किती
मोल काही मिड ना
यत्नांच्या या शर्यतीत
भाग चांगले जुड ना

दर्शनाला देवा तुझ्या सांग कुठं येऊ रे
जिंदगीच्या रानामंदी रोप काय लावू रे

जीवन झालं वखरून सार
ढेकळ काही फूट ना
मुरवण्यासाठी माती
आभाळ गर्जून तूट ना

नजरेनं आशेच्या मी कुणाकड पाहू रे
जिंदगीच्या रानामंदी रोप काय लावू रे

हाती रेषा कितीक मोठ्या
एक ही ती पाव ना
देऊन कला अंगी आता
मार्गी तरी लाव ना

नशिबाला दोष कधीपर्यंत मी देऊ रे
जिंदगीच्या रानामंदी रोप काय लावू रे
सांग देवा पेरणीला भोग काय दावू रे
***********
शशिकांत शांडीले (एकांत), नागपूर
मो.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!