II मकर संक्रांति II-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 12:09:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II मकर संक्रांति II
                                           लेख क्रमांक-3
                                      --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

                            मकरसंक्रांत माहिती---

     मकरसंक्रांत हा सण इंग्रजी कालगणनेप्रमाणे चौदा जानेवारीला व भारतीय पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. तसे पाहिले तर संक्रांत दर महिन्यात असते. राशी बारा आहेत. सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रमण किंवा संक्रांत म्हणतात; पण मकर आणि कर्क राशींचे संक्रमण विशेष महत्त्वाचे असते. सूर्य मकर राशीत जातो, तेव्हा उत्तरायण सुरू होते. हा दिवस म्हणजे मकरसंक्रांत.

     आर्य लोक प्रथम ध्रुवप्रदेशात राहत होते, असे मानले जाते. तेथे सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असतो. तेव्हा रात्र संपल्यानंतर येणारा सूर्याचा पहिला किरण म्हणजे माणसाला देवाची कृपाच वाटली असेल. म्हणून तेव्हा वर्षाची सुरुवात मकरसंक्रांतीला होत असे. नंतर ही वर्षाची सुरुवात पुढे ढकलली गेली.

     त्या काळी संक्रांत ही श्राद्धतिथीही असे. कारण सहा महिन्यांच्या रात्रीमुळे राहून गेलेली श्राद्धे या दिवशी होत.

                       2022 मध्ये मकर संक्रांत कधी आहे?---

     पंचांगानुसार 2022 मध्ये मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2022 रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला शुक्रवारी साजरा केला जाईल.

                           मकरसंक्रांतीचा इतिहास---

     मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काल मानला जातो. याबद्दल अशी गोष्ट आहे की, महाभारतातील कौरव-पांडवांचे युद्ध चालू होते. अर्जुन भीष्मांशी लढत होता पण ते त्याला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडीला पुढे उभे केले आणि तो त्याच्याआडून लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्मांनी आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका व अंबालिका अशा तीन राजकन्या पळवून आणल्या होत्या.

     अंबेचे दुसर्‍या राजावर प्रेम होते म्हणून भीष्मांनी तिला त्याच्याकडे पाठवले; पण पळवून नेलेल्या मुलीचा स्वीकार करायला त्याने नकार दिला. ज्या भीष्मांमुळे हे सारे झाले त्यांचा सूड घेण्याचे अंबेने ठरवले. ती तपश्चर्या करून शिखंडी नावाचा पुरुष झाली आणि भीष्मांशी लढायला आली. पण ती पूर्वी स्त्री होती म्हणून भीष्म शिखंडीशी लढेनात. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळले. त्यांच्या अंगामध्ये इतके बाण घुसले होते की, ते जमिनीवर खाली न पडता बाणांच्याच गादीवर आडवे झाले. तेव्हा दक्षिणायन सुरू होते. पण भीष्म इच्छामरणी होते म्हणून त्यांनी उत्तरायणाचा शुभ काल सुरू होण्याची वाट पाहिली आणि मगच प्राण सोडले.


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी मी.कॉम)
                     -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.