दैवाचे फासे..................

Started by rudra, May 11, 2010, 10:17:50 PM

Previous topic - Next topic

rudra

दैवाचे फासे

पहिल्यांदाच गावाकडून आलेली मंदा. राहणीमानानं गावंढळ असली तरी सुशिक्षित, सुरेख आणि निर्मळ मनाची.

मुंबईला जाण्याच्या संकल्पनेने अगदी गोंधळून गेली होती. पंचांगातील तारीख आणि घडयाळाचे काटे सांगितल्याने थांबण्यासारखे नव्हते. काही दिवस उलटून गेले. तिने अण्णांना विचारलंच कारण, अण्णांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख. "अण्णा केव्हाच्या एस.टी. नं जायचय?".

मंदा म्हणजे अण्णांची सख्खी मुलगी नव्हती. अण्णांनाही मुलबाळ नव्हतं. अण्णांची पत्नी एका अपघातात मरण पावली होती. त्यांनी मंदाला अनाथ आश्रमातून ती एक वर्षाची असताना दत्तक घेतलं होतं.

अण्णा वाडीतल्या नारळीवरचे नारळ ठाकराकडून उतरवून घेत होते. तिथूनच त्यांनी उत्तर दिलं, "उद्या सकाळी सहा वाजता संतोच्या घराकडून निघू". संतो त्यांच्याच आळीमधला रहिवाशी. गावाच्या वेशीवर बरीचशी जमीन होती त्यांची. भावाभावात वाद नको म्हणून.... जमिनी संदर्भात सारखं मुंबईला वकिलांकडे येणं जाणं असायचं त्याचं. सांगितल्याप्रमाणे मंदाने तयारीला सुरुवात केली पण, मन तिला आतून डिचवत होतं. अण्णांनी तडकाफडकी मुंबईला जाण्याचा निर्णय का बरं घेतला असावा हा प्रश्न तिला सारखा सतावत होता.

शेवटी तिच्याने रहावलं नाही. घरून निघताना तिने अण्णांना विचारलं, "आपण मुंबईला कशासाठी जातोय?" अण्णांनी तिच्याकडे पाहत चेहरा हसरा केला, "अगं वेडे तू काय आता वाडयात खेळण्यासारखी लहान राहिली नाहीस. मुंबईच्या शंकररावांनी तुझ्यासाठी स्थळ आणलंय. त्याचीच बोलणी करायला चाललोय".
काय? – मंदा
एवढं बोलून ती सुबुद्ध झाली.
पुढे अण्णांनी प्रवासात सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या.
"पण, अण्णा तुम्हांला सोडून जायचं" ... मला नाही पटत.
"अगं वेडे हिच वेळ तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील भाग्योदयाची वेळ असते. सौभाग्य हा तर स्त्रीचा खरा दागिना मानला जातो". – अण्णा.

मंदाचा उदासीन चेहरा पाहून अण्णांनी संतोला तिच्या मनाची समजूत काढायला सांगितली. बोलण्या बोलण्यात वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. झाडाझुडपांना मागे टाकत एस.टी. मोठे मोठे पूल चढ उतार करत होती. मंदा हे सारं पहिल्यांदाच अनुभवत होती. उंच इमारती, पक्के रस्ते, माणसांची रहदारी. इतक्यात एस.टी. तील एक एक व्यक्ती पुढे येऊन उभा राहू लागला. संतोही उठला, पाठोपाठ अण्णा नंतर मंदा. त्यांनी सीटखालच्या बॅगा खेचल्या आणि उतरायच्या रांगेत उभे राहिले. एस.टी. स्टँन्डवर उतरताच मंदाची नजर चारी दिशांना एक टक फिरत होती. ते सारं ती न्याहाळून पाहत होती. मुंबई अशी असते हे तिला पहिल्यांदाच बघायला मिळाली होती. निरनिराळ्या रंगानी नटलेली मुंबई तिच्या डोळ्यांत उरत नव्हती. ते न्याहाळत असताना ती इथं कशासाठी आली आहे याचा तिला विसर पडला होता.

तिघंही तिच्या मावशीच्या घरी वस्ती करणार होते. तिकडेच तीन दिवसांचा कार्यक्रम आटोपून पुन्हा गावी परतण्याचा बेत ठरला. मंदाच्या मावशीची मुलगी सुरेखा ही जवळपास तिच्याच वयाची होती. नुकतीच बी.ए.ची परीक्षा दिली होती. शिवाय मॉर्डन. दोघीही मनमिळावू स्वभावाच्या असल्याने दोघींची चांगलीच जोडी जमली.
झालं.
मंदाला पहायला येण्याचा दिवस उगवला.
सुरेखा मुंबईचीच असल्याने तिला फॅशनबद्दल बरीच माहिती होती. सुरेखाने मंदाला गृहिणीच्या वेशात नटवली होती.
अण्णाही खादीचे कपडे घालून दारात खुर्ची मांडून पाहुण्यांची वाट बघत बसले होते.
संतोही वकिलांची भेट घेऊन आला होता.
ठरलेल्या वेळेनुसार दिड तास अधिक उलटून गेला तरी पाहुण्यांचा पत्ता नव्हता. आता अण्णा खुर्चीवरून उठून वऱ्हांडयात येरझारा घालीत होते. घरातल्या साऱ्या मंडळींची मनस्थिती चिंतातूर झाली होती. संतोही इमारतीच्या गेटपाशी पाहून आला. काही कळायला मार्ग नव्हता.

दिड तास उशिरा का होईना पण पाहुणे आले कळताच सर्वांचे चेहरे प्रफुल्लीत झाले. मावशीनं सुरेखाला बोलावलं आणि चहा पाण्याचं बघायला सांगितलं.
लागलीच सुरेखा स्वयंपाक घरात गेली आणि मंदाला पाहुण्यांना चहा करून घेऊन जाण्यास सांगितला. पाहुण्यांसोबत मावशी शंकरराव, अण्णा आणि संतो बोलणी करत होते.

मुलासोबत त्याचे आई-वडिल आणि धाकटा भाऊ देखील आला होता. मुलगा एम.ए झालेला शिवाय सरकारी ख्यात्यात क्लार्क होता. थोरल्या बहिणीचं लग्न झालं होतं ती मुंबईतच असते. धाकटया भावाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि आता कुठे कॉम्पुटरचं प्रशिक्षण घेतोय. वडिल गिरणी कामगार.

मावशीने मंदाला सर्वाना चहा दयायला सांगितला. चहा पाण्याचं झाल्यावर मावशीने मध्येच नांगी मोडली. "तुम्हां दोघांना काही वैयक्तिक प्रश्न विचारायचे असतील तर विचारा".

पहिल्या भेटीतच मंदा त्यांना पसंत पडली होती आणि मंदालाही मुलगा पसंत होता. मुलाकडच्यांनी त्यांचा निर्णय तिथेच सांगितला.

मावशीने मंदाला आतल्या खोलीत जायला सांगितलं. त्यांना काही घेण्यादेण्याच्या गोष्टी करायच्या होत्या. सुरेखाने मंदाच्या मनाची स्थिती ओळखली होती. मंदाच्या ओठांवरचं स्मित बरंच काही सांगत होतं म्हणून सुरेखा मुद्दामच तिची छेड काढत होती.

पाहुणे निघायच्या तयारीत होते. साखरपुडयाची तारीखही त्याच दिवशी ठरली आणि त्यानंतर काही दिवसांत लग्नाचा  कार्यक्रम पार पाडण्याचं ठरलं. अण्णांना दोन महिन्यात सगळी तयारी करायची होती.

तिघेही पुन्हा आपल्या गावी परतले.

जसजशी साखरपुडयाची तारीख जवळ येत होती तसतशी दोघांच्या मनाची स्थिती चिंतातूर होत होती. एके दिवशी अण्णा गंभीरपणे विचार करत बसले असताना मंदा त्यांच्या जवळ आली. अण्णा तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत राहिले. एकाएकी मंदाने त्यांचे पाय धरले. आपलं डोकं त्यांच्या डोक्यावर ठेऊन ढसाढसा रडू लागली. अण्णा स्तब्धच होते. मनमोकळं रडून झाल्यावर मंदा हलक्या स्वरात अण्णांना म्हणाली.
"अण्णा मी लग्न करणार नाही".
अण्णांनीही तिला त्याच स्वरात उत्तर दिलं.
"असं वेडयासारखं काय बोलतेस मंदा" तुला मुलगा पसंत नाही का?
"तसं नाही अण्णा" – मंदा
"मग त्याच्या घरची माणसं?"
"नाही!" पुन्हा मंदाने दोन अश्रू ढाळले.
मग झालं तरी काय? – अण्णा
"मी तुम्हांला सोडून जाणार नाही!, अण्णा तुम्ही माझ्यासाठी घरजावईच शोधा."
अण्णा डोळ्यातले अश्रू पुसत हसत म्हणाले, "अगं वेडे, माझी अक्का मला सांगायची" (अक्का म्हणजे अण्णांची मानलेली बहिण), ती सांगायची आपल्या मुलांना मार्गी लावणं म्हणजे आपल्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडे करून घेण्यासारखं असतं.
"ते काही मला माहित नाही, घरजावईच बघा!" ...
"कसाही असला तरी चालेल" – मंदा मुरडतच म्हणाली.
कशीतरी अण्णांनी मंदाच्या मनाची समजूत काढली.

काही दिवसांनी मंदाचा साखरपुडा पार पडला आणि अखेर मंदाची लग्नमंडपात उभी राहण्याची वेळ आली. सर्व मंगलविधी व्यवस्थित पार पडल्या.

आता पाठवणीची वेळ. अण्णांच्या सहवासात वाढलेल्या आठवणींच्या वियोगात सोबत नवी नाती जुळली. सुख दुखांचे अश्रू अगदी भळभळून वाहू लागले. काही वेळाने दोघांनी एकमेकांच्या भावनांवर आवर घातला.

मंदाचा काही वेळ प्रवासात निघून गेला. मंदा तिच्या सासरी पोहचली. तिने तिच्या नविन घरात गृहप्रवेश केला. तिने आजवर कधी न अनुभवलेली नाती तिला लाभली होती. काही महिने तिचा संसार अगदी सुरळीत चालला होता. त्यानंतर तिला देवासारखी वाटणारी माणसं तिच्यावर नागासारखी फुस्कारू लागली. सरडयाप्रमाणे बदलणारे सगळ्यांचे रंग तिला दिसु लागले.

का? घडावं तिच्या आयुष्यात असं की, तिला स्वत:च्या अस्तित्वाची चिड येवू लागली. माणसं जशी दिसतात तशी खरंच नसतात. सासू म्हणजे अगदी चुलीतला विस्तव, जरा जरी गोष्ट इकडची तिकडे झाली की, मंदाची खैर नसायची. सासरेबुवा अट्टल दारुडे, तोंडाला येईल त्या शब्दाने मारायचे. धाकटा दिर वाईट नजरेचा. रामासमान भासणारा नवरा देखील अट्टल जुगारी नी अय्याश वृत्तीचा निघाला. बाहेरच्या भानगडीचा सारा राग मंदावर काढायचा. कधी पट्ट्याचा मार, कधी गरम गरम कावित्याचे चटके.

या सगळ्याला ती कंटाळून गेली होती. अण्णांना सांगायच तर त्यांना काय वाटेल म्हणून मुकाटपणे सगळं सहन करत होती. लग्नाचं एक वर्ष उलटून गेलं नाही तर मंदाचे हे हाल.

तीन चार महिने झाले यंदा मंदा अण्णांना भेटली नव्हती म्हणून अण्णाच तिला भेटायला तिच्या सासरी गेले. तेव्हा शेजाऱ्यांकडून त्यांना तिच्या हालअपेष्टा कळल्या. ते ऐकून अण्णांच हृदयात एकदम धस्स झालं. मंदाच्या बाबतीत असं घडेल याची त्यांना जराही कल्पना नव्हती.

अण्णांनी तिच्या सासरी तिला माहेरी घेऊन जाण्याचा प्रस्ताव मांडला पण तिच्या सासरच्या माणसांनी अण्णांना सरळसोट नकार दिला.

काही महिन्यांनी अण्णांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच अण्णांच निधन झालं. अण्णांच्या कार्याच्या दिवशी सगळी नातेमंडळी जमा झाली होती. त्यात त्यांच्या प्रॉपर्टीवर मंदाचा वारसा हक्क राहील यावर चर्चा झाली. जवळपास आठ दहा लाखांची प्रॉपर्टी मंदाची होणार हे कळताच तिच्या सासरच्या माणसांनी तिच्यावर तिची प्रॉपर्टी बळकावण्याकरता दबाव आणला. अखेर तिने नेहमीच्या होणाऱ्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून नवऱ्याकडून सोडचिट्ठी मागितली, पण ते शक्य नव्हतं. कारण नवऱ्यावर आधीच जुगारात हरल्याचं दोन लाखाचं कर्ज होतं. तिने आपला सगळा भूतकाळ मावशीच्या कानावर घातला. मावशीच्या मदतीने तिने संतोच्या वकिलांशी बोलणी करून कोर्टात केस उभी केली, आणि अखरे केसचा निकाल मंदाच्या बाजूने लागला.

आता मंदा तिच्या माहेर गावी निघून आली. तिचे काही दिवस असेच जुन्या आठवणीत निघून गेले. हळुहळु तिच्या लक्षात आलं नुसती लाखो रुपयांची प्रॉपर्टी असली म्हणजे पोट भरता येतं असं नाही. त्यासाठी आता आपल्याला हात पाय हलवावे लागतील. याचा विचार करत ती ओटीवर बसली होती. तेवढयात तिला समोरून तिच्या दिशेने एक इसम येताना दिसला आणि तो तिच्या समोर येऊन थांबला.

व्यवस्थित इन शर्ट केलेला, पायात पॉलीश केलेले बुट पण त्यावर वाटेवरची थोडीशी धुळ चिकटलेली होती म्हणून ते मधूनच चमकत होते, डोळ्यांवर काळा गॉगल यावरून तो वेल एज्युकेटेट असल्याचे दर्शवत होता. मंदा त्याच्याकडे प्रश्नचिन्ह होऊन पाहत होती. तिला त्याला ओळखणं कठीण होत होतं. त्याने अंगणातच तिला विचारलं तू मंदा ना?
ती एकदम गडबडून गेली.
तिने उत्तर दिलं हो! पण, तुम्ही कोण?
"अण्णांबद्दल कळलं म्हणून आलो होतो, कसं काय घडलं हे सारं?" त्याने दबक्या आवाजात विचारलं.
"त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले" मंदाचा आवाज जड झाला होता, पण आपली ओळख? मंदाने विचारलं.
त्याने डोळ्यांवरचा गॉगल डोक्यावर चढवला. आपण बसून बोललो तर चालेल का?
"माफ करा मी विसरलेच होते, या ना आत या" मंदाने त्याला बसायला खुर्ची दिली. पाण्याचा ग्लास आणून त्याच्या पुढयात ठेवला.

आपली ओळख म्हणजे मी तुमच्यासोबत बारावीला कॉलेजमध्ये होतो. तुम्हांला आठवतं ... मी तुम्हांला इकोच्या नोट्स दिल्या होत्या. परीक्षेचे काही दिवस आपण एकत्रच अभ्यास केला होता. हो माझ्या चेहऱ्यात, वागण्यात थोडा बदल झाला आहे म्हणूनच तुम्हांला आठवत नसेलही कदाचित. जाऊ दे मीच सांगतो "मी सुधीर! सुधीर मालाडकर". मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करतो. तुमचं लग्न झाल्यानंतर मी अण्णांची भेट घ्यायला यायचो. अण्णा माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते.

मध्येच मंदाला आठवलं "सुधीर तू! नाही म्हणजे सुधीर तुम्ही" मंदा स्वत:ला सावरत म्हणाली.
काही हरकत नाही, तुम्ही मला सुधीर म्हणालात तरी चालेल. पण मी एकदा त्यांना भेटलो होतो त्यावेळी ते मला फार अस्वस्थ वाटले, त्याचं कारण मला त्यांनी कळू दिलं नाही आणि तुम्ही तर मुंबईला राहता ना? मग तुम्ही ... एवढयात मंदाच्या डोळ्यांतून अश्रु गालावर तरळले. तेव्हा तिने एका मैत्रीच्या नात्याने त्याला मन अगदी उघडं करून सारी कहाणी सांगितली.

"तुम्हांला एखादं मुलबाळ?" सुधीरने विचारलं.

नाही मी फक्त त्यांची मोलकरीणच होते. त्यांनी पत्नी म्हणून माझा कधीच स्वीकार केला नाही. सासरच्या जाचाला कंटाळून मी त्यांच्याशी सगळे संबंध तोडून कायमची इथे निघून आले आणि अण्णांनाही माझ्याबद्दल कळलं होतं त्यामुळेच ते अस्वस्थ असायचे आणि त्याचं जाण्यामागचं कारणही तेच आहे.

तुम्ही घेतलेला निर्णय मला पटला. का म्हणून स्त्रीने अशा छळाला बळी पडायचं "यु आर एबसुलेटली राईट" मनगटावरच्या घडयाळाकडे पाहत सुधीरने आपले विचार व्यक्त केले.
आता फार उशिर झालाय, मला निघायला हवं. "पुन्हा कधीतरी येईन सवडीने तुम्हांला भेटायला, तुमची हरकत नसेल तर" पायात बुट सरकवत सुधीर निघून गेला.
"चालेल" – मंदा

काही महिन्यांनी सुधीर मंदाला भेटायला आला. तोवर मंदा पुर्णपणे स्थिरावली होती. सुधीरचही नात्यातलं कोणीच नव्हतं. आईवडील लहानपणीच वारले होते. दोघांची मैत्री अगदी जमून गेली. महिन्यांच्या भेटी आठवडयात होऊ लागल्या आणि आता तर नेहमीच भेट होत होती. दोघांची मने आणि विचार एकदम जुळत होते.

बोलण्या बोलण्यात एकदा सुधीरने तिच्या जवळ तिच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्याच्या या अशा प्रस्तावाने मंदा एकदम गोंधळून गेली.
"अरे सुधीर तुला माहित असुन आधी माझं लग्न झालेलं असुन तू असा वेडेपणा करतोस आणि तू अजून अविवाहित आहेस".
तर काय झालं? पुरुषांनीच दोन लग्न करायची असतात का? स्त्रियांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही? त्यांनी आपलं जीवन असंच एकटीने का म्हणून जगावं?
त्याच्या या अशा विक्षिप्त प्रश्नांनी मंदाचं डोकं भिनभिनत होतं.
"ते काही नाही मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, अरे आपला समाज काय म्हणेल?" ...

मंदा मला एक सांग जेव्हा सासरची माणसं तुझा छळ करत होते तेव्हा हा समाज तुझ्या मदतीला धावून आला होता का? आज तू एकटी पडलीस तेव्हा हा तुझा समाज तुझी विचारपुस करण्यासाठी येतो का? तुला तुझं स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार नाही? तू तुझ्या भावना आणि आशांना का मनातल्या मनात दाबून टाकतेस? समाज तुला फक्त अडवू शकतो, तुझं जीवन घडवू शकत नाही! ते तुझं तूच घडवू शकतेस आणि जर का तुला वाटत असेल हा समाज तुझ्या आणि माझ्या आड येत असेल तर मी येईल त्या संकटाला सामोरं जायला तयार आहे. आता तुझं तू ठरव ... आणि सुधीर तिथून निघून गेला.

मंदा रात्रभर त्याच्या बोलण्यावर विचार करत होती. अधून मधून तिला सुधीरचं बोलणं पटत होतं. मध्येच तिला तिचा भुतकाळ आठवत होता. तिची या कुशीवरून त्या कुशीवर सारी रात्र विचार करण्यातच निघून गेली. तिला एक विचार सारखा सतावत होता.
"माणसं जशी दिसतात तशी नसतात, सुधीरही तसाच निघाला तर" ...
पण यावेळेस तिने ठरवून टाकलं, आपणही एक जीवनाचा जुगार खेळून पाहू, पुढे असेल ते माझं प्रारब्ध!

तिने सुधीरला होकार दिला.
तिने मावशीलाही कळवलं.
मंदा तू पूर्ण विचार केलास ना? नाही आधी म्हणजे तुझं ...
हो मावशी त्याला माहित आहे सारं – मंदा

अखेर मंदा पुन्हा एकदा लग्नमंडपात उभी राहिली. लग्न अगदी साध्या पद्धतीने आटोपलं आणि पाहता पाहता सुधीरने मंदाचे पूर्ण जीवनच बदलून टाकलं. ज्या ज्या सुखांपासून ती वंचित होती ती सारी सुखं दैवाने तिच्या झोळीत टाकली.

या गोष्टीला आज वीस वर्षे उलटून गेली. ऐकण्यात आलंय आता तिने सुधीरच्या मदतीने वाडयात महिला मार्गदर्शन केंद्र उघडलंय आणि तिच्या सोबत तिच्या कार्याला हातभार लावण्यास तिची मुलगी असते आणि मंदा आता विश्वासाने सर्वाना सांगते, "काही माणसं अगदी दिसतात तशीच असतात".

- सुनिल संध्या कांबळी.
   9892289151.



gaurig

Apratim aahe lekh.........khupach chan......keep it up Rudra.....

काही माणसं अगदी दिसतात तशीच असतात