II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-निबंध क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 03:35:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                         निबंध क्रमांक-3
                           ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                 छत्रपती शिवाजी महाराज निबंध---

     आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या तेजोवलयाने अखिल भारताला दीवपून टाकणारे शिवराय एक अस्सल 'युगप्रर्वतक युवानेता' होते. शिवरायांच्या कार्यरूपी शलाकेने दशदिशा उजळून टाकल्या. या प्राचीन देशाचे देशपण कायम राखले. भावी पिढ्यांसाठी एक चिरंतन आदर्श निर्माण करून ठेवले.

     त्यांनी व्यक्ती म्हणून स्वतःसाठी न जगता, विलास न भोगता हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न केले. शिवाजीराजे वर्तनाने सद्गुणी, धर्माचरणी व संयमशील होते. मुत्सद्दीपणा, शौर्य, शुध्दाचरण यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या ठायी होता.

     लहानपणापासून त्यांनी फार अनमोल माणसे जमविली होती. आपल्या प्रेमाने सर्वांना जिंकले. हृदय अर्पण करून एक एक शेलका दागिना उचलला. कशाच्या जोरावर? हृदयातील स्नेहाच्या जोरावर! त्या सर्वांचे कुशल नेतृत्व केले.

     प्रतिकूल परिस्थितीत , गुलामी परंपरेत मोगलासारखा बलाढ्य शत्रूसमोर असतांना शिवरायांचा दुढ दरारा , स्वालंबन वाखाणण्यासारखे आहे. मनुष्यगुणांची उत्तम पारख व कदर त्यांना होती म्हणूनच बाजीप्रभू, तानाजी , येसाजी, मुरारबाजी , जिवा यांच्यासारखे निष्ठावंत व स्वामीभक्त त्यांना लाभले..

     आदर्श राजा , शूर नेता कसा असावा तर शिवरायांसारखा ! 'न भूतो न भविष्यति' असा हा राजा! दूरदृष्टी, प्रसंगावधान , योजनाबध्दता, जागरूकता, कार्यकुशलता, न्यायप्रियता, कर्तव्यकठोरता, शौर्य, धैर्य, द्रष्टेपणा हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते.

     ज्वलंत राष्ट्रभक्ती, सर्वधर्म सहिष्णूता त्यांच्या रक्तात भिनली होती. चाणाक्ष बुध्दी. विश्वासू, दयार्द्र , श्रध्दाळू, निर्व्यसनी असे शिवराय मुत्सद्दी होते. 'धर्मासाठी लढा नाही , देशासाठी आहे' हे त्यांचे विचार होते. प्रजाजन आणि स्वकीय यांच्यावर त्यांचे प्रेम होते. 'पर स्त्री मातेसमान' या विचाराचे त्यांचे चरित्र्य उज्ज्वल होते.

     ते मातृभक्त , गुरूभक्त आणि ईश्वरभक्त होते. संकटावर मात करण्यासाठी त्यांनी ठेवलेले धोरण, जनकल्याणाची इच्छा, शत्रूशी वागण्याची नीती यामुळे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले. व्यावहारिक तारतम्य बुध्दी व मानवता प्रेम त्यांच्या चरित्रात आढळते. त्यांचे यशस्वी , तेजस्वी आणि ओजस्वी नेतृत्व भारताला लाभले हे अहोभाग्य होय.

     'शिवनेरी किल्ल्यावर शिवबा जन्माला आले. 'जिजाऊ' सारखी माता आणि दादोजी कोंडदेवसारखे गुरू त्यांना लाभले. महाराष्ट्रावरचे संकटाचे सावज दूर करण्यासाठी जिजाऊंनी शिवबाला घडविले. मावळे सहकारी निवडून बालपणापासून स्वराज्याच्या ध्यास त्यांनी घेतला.

     स्वराज्य स्थापना हे अंतिम ध्येय पूर्णत्वास जावे म्हणून अखंडपणे तीस वर्षे राजांनी कामगिरी केली. स्वातंत्र्याचे बीज पेरून मराठ्यातील पराक्रमाला त्यांनी जिवंत केले. बलाढ्य शत्रूला शक्तीने प्रसंगी युक्तीने तोंड दिले. सैन्य थोडे असूनही मोठ्या निष्ठेने त्यांनी हा लढा दिला.

     तोरणा किल्ला जिकंणे, पुरंदरचा तह, अफजलखानाचा वध, आग्याहून मिठाईच्या पेठाऱ्यातून सुटका असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात आले. पण स्वतःसाठी न जगणारा हा राजा त्याच्या कार्याशी इतका काही एकरूप झाला होता की , शिवराय आणि त्याचे कार्य या दोन गोष्टी अभिन्न आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

"सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया
सर्वे भद्राणि पश्यन्तु न कश्चिद दुःखमाप्नुयात।"

     सर्व लोक सुखी असोत, सर्व लोक निरोगी असोत, सर्व सुखकारक गोष्टी पाहोत आणि कोणीही दुःखी नसावेत ही शिवरायांची इच्छा होती. शिवराय दलितांचे मुक्तिदाते, रक्षणकर्ते होते. स्वातंत्र्योत्तर काळातही ज्या ज्या वेळी देशावर संकटे आली, तेंव्हा तेंव्हा या नेत्याचे स्मरण भारतवासीयांना झाल्याशिवाय राहिले नाही. आ सेतू-हिमाचल राष्ट्राला

हृदयाच्या श्रीमंतीने जिकंणारा हा राजा!
"झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा !"

     असा आमचा लाडका राजा! त्यांच्या गुणांचे दर्शन घडविताना रामदास स्वामी म्हणतात "निश्चयाचा महामेरू बहुतजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी!"

--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-एसे मराठी.कॉम)
                      -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.