II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-भाषण क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 04:33:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                           भाषण क्रमांक-1
                              ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

               छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त भाषण---

     सर्व प्रथम परम पवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार,सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिकहो. आज  मी येथे अशा एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला जगाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.

"सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला
भगवा टीका चंदनाचा शिवनेरी वर प्रगटला
हातात घेऊन तलवार शत्रू वर गरजला
महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला"

     19 फेब्रुवारी सोळाशे 30 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमानयोगी, लोककल्याणकारी राजे, शासनकर्ते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय.

     शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते.

     शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले कडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांच्या प्रशिक्षण घेतले.

     शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले.रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून  स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली.

     स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी  सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू.त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर कोंडाजी फर्जद अशा अनेक शूर वीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती.

     शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूला धुळ्यात पाडले म्हणजे त्यांना हरवून टाकले.आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले.छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रुंचा नाश करुन हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणीले.

     6 जून 1674 रोजी आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आणि सुमारेसाडे तीनशे वर्षे गुलामगिरीत पडलेल्या,जुलमी शासन कर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या, गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी, न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपाने मिळाला.

     शिवाजी महाराजांचा लढा अन्यायाविरुद्ध होता. मुसलमानाविरुद्ध नव्हता.  शिवराय हे सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानत. अफजलखान भेटीच्या वेळी त्यांच्या सैन्यात सिद्धी इब्राहीम हा त्यांचा प्रमुख विश्वासू सेवक होता.

     शिवराय हे  पर्यावरण प्रेमी होते. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ते मदत करत असत. त्यांचा सर्व सारा माफ करत शेतकऱ्यांच्या हिताकडे ते लक्ष देत. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांचा आदर होता व सन्मान होता. शेतकऱ्यांना मान होता. साधूसंतांचा आदर होता. आणि प्रत्येक मराठी माणसाला शिव छत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता.अशाप्रकारे शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर ते एक स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे एक शिल्पकार होते.

"राजे असंख्य झाले आजवर या जगती
पण शिवबासमान मात्र कुणी न झाला
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवबा झाला"
--जय भवानी जय शिवाजी

     एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय.

--Team infinitymarathi
--------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इन्फिनिटी मराठी.इन)
                     ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.