II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II- भाषण क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 04:40:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                          भाषण क्रमांक-5
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                   छत्रपती शिवाजी महाराज भाषण---

     आदिलशाही, निजामशाही, आणि मुघल या सत्तांविरोधात शिवरायांनी आपली मोहीम राबवली. मावळे, विश्वासू कर्तबगार साथीदार, आणि आई भवानीचा आशीर्वाद सोबत घेऊन या सत्तांविरोधात जबरदस्त लढा दिला. सुरुवातीला पुणे प्रांत जिंकत त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न हळूहळू सत्यात उतरवायला सुरुवात केली.

     अफजलखान स्वराज्यावर चालून आलेला असताना त्याचा बंदोबस्त अत्यंत युक्तीने करून शिवरायांनी आपली बुद्धीची चुणूक दाखवली. त्याप्रमाणे "शायीस्ते खानाची बोटे कापणे", "आग्र्याहून सुटका", "पुरंदरचा तह" अशा प्रसंगांत शिवराय किती पराक्रमी, संयमी, आणि अढळ होते हे दिसून येते.

     स्वराज्य निर्मितीच्या स्वप्नात अनेक मावळे शिलेदारांनी शिवरायांसाठी स्वतःचे प्राण अर्पण केले. आदिलशाही, निजामशाही, आणि मुघल या तिन्ही सत्तांनी शिवरायांचे अस्तित्व मान्य केले होते. आता रयतेचा विचार करून त्यांचे हित जपणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले. इ. स. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला.

     राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वराज्याचे स्वतंत्र चलन सुरू केले. "प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे." असा अर्थ असणारे राजमुद्रेवरील संस्कृत सुभाषित खालीलप्रमाणे,

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"

     शिवरायांनी आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या. स्वराज्याचा पहिला छत्रपती म्हणून शिवराय हेच रयतेकडून सर्वमान्य झाले होते. शिवरायांची गाथा संपूर्ण भारत वर्षात दुमदुमत होती. अशा या वीर पुरुषाची प्राणज्योत अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी मालवली.

     संपूर्ण जीवन एक धगधगती ज्वाला आणि संघर्ष बनवणारा, स्वराज्य निर्मितीसाठी आणि लोकहितासाठी स्वतःचे जीवन पणाला लावणारा असा नरवीर, पराक्रमी, राष्ट्रपुरुष छत्रपती महाराष्ट्र भूमीत जन्माला आला आणि मातृभूमी धन्य करून गेला. असा राजा पुन्हा होणे नाही. राजा शिवछत्रपती एकच होता, एकच आहे आणि एकच राहील. अशा या युगपुरुषाचे संस्मरण अनंत काळापर्यंत होत राहो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना!

--मराठी ब्लॉगर
--------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-डेली मराठी न्यूज.कॉम)
                 -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.