विचारांशी गप्पा

Started by yallappa.kokane, February 26, 2022, 09:17:24 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

विचारांशी गप्पा

    शेवटच्या श्वासापर्यंत एकच जीवलग आपल्यासोबत असतो, तो म्हणजे 'विचार'. रोज अनेक विचार आपल्याला मिठी मारून जातात. मग ते विचार चांगलेही असतात व वाईटही असतात. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की आपल्या मनात एका दिवसात साठ हजारांहून अधिक विचार येत असतात. त्यातले वाईट किती व चांगले किती हे बाह्य मन ठरवते व ते ठरवलेले विचार अंतर्मनाकडे सत्यात उतरविण्यास पाठवत असतात. वयानुसार विचार बदलतात आणि विचाराने माणूस घडतो. मनात चालणाऱ्या विचारांशी गप्पा मारत आपल्याच जगात वावरत असताना दुर दुरचा प्रवास अगदी लवकर संपतो अशी नेहमीच जाणीव होत असते. ती जाणीव होणं स्वाभाविक आहे कारण एका एका विचारात आपण इतकं गुंतलेले असतो की त्याची सुटका आपल्याला भान आल्यावर होत असते. विचार म्हणजे एक प्रकारचा अडकित्ताच आहे. विचारांमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा पार भुगा होऊन जातो.
    आपल्या नावाला, आपल्या अस्तित्वाला समाजात टिकून ठेवण्याचं काम आपले विचार करीत असतात. कारण आपल्या विचारांचे परिणाम सर्वत्र उमटत असतात. आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण केलेले विचार व त्या विचारावर केलेली कृती आहे. आपल्या विचाराने समाजाला शहाणे करण्याचं काम हे विचारांच वेड लागलेली माणसंच करू शकतात. अशी विचाराची वेड लागलेली माणसं समाजाच्या प्रगतीसाठी असणं गरजेचं आहे. माणूस घडतो आणि बिघडतोही फक्त विचारांमुळेच. या गोष्टीचा विचार करूनच आपण विचार करायला हवा. आपल्याला घडायचे आहे की आपले स्वतःचे नुकसान करून घ्यायचे आहे हा निर्णय वेळेवर घेता आला पाहीजे. ठराविक वेळेत कोणत्या विचाराने आपल्या मनात प्रवेश केला पाहीजे याचेही नियम असायला हवे. असे असल्यास माणसाची 'चिंता' वाढणार नाही. चांगल्या क्षणी मनात वाईट विचार येत असतात आणि शुभ कार्य होता होता राहून जातं. कोणताही विचार करायला अडथळा येत नाही पण जे विचार केलं आहे ते पूर्ण करण्यास कोणकोणते अडथळे येऊ शकतात याचाच विचार मनात घोळत असतो. अशा विचारातून कोणीही सुटू शकत नाही. मनात आलेल्या एका विचारावर हजार वेळा विचार करणे हे कधीही हितकारक असतं. चांगले विचार हे चांगलेच असतात पण वाईट विचारांवर चांगला विचार केला तर सुरक्षित मार्गही सापडतो.
    मनातील विचार आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करीत असतात. त्यासाठी वाईट विचार मनात न आणता चांगला विचार करण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे स्वतःला व आपल्या माणसाला त्रास होत नाही. आपल्याला त्रास होईल असे विचार करणे थांबवून चांगले विचार केल्यास शरीरात एक सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. त्यामुळे भविष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. सर्वात जास्त वेगवान आपले विचार असतात. विचारांच्या वाटेवर एका वळणावर थांबणे (विचार करायचे थांबणे) फार गरजेचे असते. नाही थांबलो तर मानसिक संतुलन बिघडून मनावर आघात होण्याची दाट शक्यता असते. चालताना पायात खडा अडकला की व्यवस्थित चालणे होत नाही. तो खडा बाजूला केल्यावर आपण न अडखळता चालायला लागतो, याचप्रमाणे मनाला टोचणारे विचार काढून फेकून दिल्यावर अस्वस्थता कमी होते. वर्तमानात आपली जी परिस्थिती आहे, आपण जे जीवन जगतो आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे आपले विचार आहे. आपल्या मनात जर कमी विचार असतील तर त्यावर तोडगा लगेच सापडतो आणि जर मनात खूप विचार साठवून ठेवले असतील तर त्या विचारांचा पूर येतो व आपलं जगणं वाहून जातं. सर्वात उंच दुसरं तिसरं काही नसून उंच हे आपले विचार असतात. त्याच विचारांच्या जोरावर माणूस उंची गाठतो. मग ती चांगल्या कामात असो वा वाईट कामात. वेगात धावणारे फक्त माणसाचे विचार असतात. त्याच विचारांचा पाठलाग करत माणूस घडत असतो. माणसातलं माणूसपण संपलं कि संशयाला जागा मिळते. नाती दुरावली व दुखावली जातात. म्हणून अंतरमनाने विचार करून खरे कोण आणि खोटे कोण हे जाणून घेणे फार गरजेचं असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर