II होळी II-लेख क्रमांक-8

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 12:42:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                             II होळी II
                                           लेख क्रमांक-8
                                          ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

                            आठवणीतील होळी---

    माझं मराठीचं

    मोठपण               

    सांगतात सारे सण

    राहू इथं एकोप्यानं.

    ठेवू धर्माची जाण

    देऊ थोरांसी मान

    घेऊ ध्यानात   

    शिकवण...

     खरंय आपल्या भारतीय सणांची परंपरा आपल्याला खूप काही शिकवते. आपल्या या सणांचे निसर्गाशी खूप जवळचे नाते आहे. प्रत्येक ऋतुंशी त्यांचे ऋणानुबंध आहे. शिशिराची पानगळ संपून झाडांना नवीन पालवी फुटू लागली की वसंत ऋतूची चाहूल लागते. कोकिळेचे मंजुळ स्वर कानी येऊ लागतात आणि आपसूकच होळीची आठवण येते. होळी हा सण जसा आनंद साजरा करण्याचा तसाच तो दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करण्याचा आहे. या होळीशी निगडीत अनेक कथा आहेत. विविध प्रांत त्यांच्या प्रथेप्रमाणे होळी साजरी करतात. होळी शक्यतो प्रदोष काळी पेटवली जाते. त्या मागची आख्यायिक अशी की---

     हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता. तो स्वतःला देवांपेक्षा सर्वश्रेष्ठ मानायचा. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा मात्र प्रचंड विष्णुभक्त होता. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला त्याच्या भक्तीपासून परावृत्त करायचा बराच प्रयत्न केला.पण त्याला काही यश आले नाही. त्याला खूप राग आला आणि त्याने आपली बहिण होलिका हीला बोलावले. त्याने तिला अग्नीत प्रवेश करून प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसायला सांगितले. होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही असा वर होता हे हिरण्यकश्यपूला माहीत होते, त्यामुळे होलिकेला काही होणार नाही पण प्रल्हाद मात्र जळून खाक होईल अशी पक्की खात्री होती. पण झाले उलटेच. म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी. विष्णुच्या परम भक्तीमुळे प्रल्हादच्या केसालाही धक्का लागला नाही पण होलिका मात्र जळून भस्म झाली. या कथेतून आपल्याला वाईटावर चांगल्याचा विजय होतो हाच संकेत मिळतो. ही घटना घडली त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा होती म्हणूनच या दिवसाला होळी पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात. सर्वांनी एकत्र यायचे आणि बेभान होऊन होळी साजरी करायची.


--अनिता गुजर
--------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                     ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.