तुकडा जमिनीचा

Started by mkapale, July 26, 2022, 11:48:13 AM

Previous topic - Next topic

mkapale

एका तुकड्यावर जमिनीच्या
उभे दोघे ..पाहती आकाश
एकाच्या डोळी लोभ पैशाचा
पाणावला दूसरा सोशी कर्जाचा पाश

दिसते एकाला उत्तुंग इमारतीचे शिखर
शोधतो दूसरा पावसाच्या थेंबाचा आसरा
काय लावाल किंमत त्या तुकड्याची सांगा
काही पोटांची खळगी कि पैशांचा ढिगारा

नशीबवान आहेस.. तू जमिनीचा मालक
ह्या जमिनीच्या वाटेने मिळेल तुला धन
कशी लावू आता काळ्या आईची रे बोली
माझे मला ठाऊक ह्या मातीचे प्राक्तन

अश्या तुकड्यात झाली घरकुले ती किती
म्हणावी प्रगती कि ह्याला अधोगती
फळणाऱ्या जागेला लागली पैशाची फळे
भार सोसे हकनाक गहिवरून ती माती

शेती म्हणा घरे म्हणा आहे सगळा व्यवहार
एकाची अभिलाषा बनतो दुसऱ्याचा विनाश
विकासाच्या नावाखाली तुकडे पडती मातीचे
सारा खेळ पहाते थकलेले हताश आकाश

- Milind Kapale