यशवंतराव चव्हाण-माहिती-1

Started by Atul Kaviraje, August 14, 2022, 07:58:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     यशवंतराव चव्हाण
                                        माहिती -1
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक आणि भारतीय घटनाकार कै. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर भारताचे आणि महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व करणारे नेते, महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री आणि माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती त्यानिमित्त....मराठी भाषेतील दोन काव्य ओळी फारच समर्पकपणे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाला लागू होतात.

                    "जन्मा येणे दैवा हाती
                     करणी जग हासवी !"

     सातारा  जिल्ह्यातील देवराष्ट्रे या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात 12 मार्च 1913 रोजी त्यांचा जन्म झाला. चौथ्या वर्षी पितृछत्र हरपले. प्राथमिक शिक्षण देवराष्ट्रेत झाले. तर माध्यमिक शिक्षण कराड येथील टिळक हायस्कूलात अनेक अडचणीतून झाले. तर एल. एल. बी. चे शिक्षण पुण्यातील लॉ कॉलेजात झाले. त्यांच्या आई विठाबाई यांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. यशवंतरावजी वयाच्या सोळाव्या वर्षी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 1942 च्या आंदोलनात त्यांनी सारा सातारा जिल्हा उतरविला होता. 1947 साली स्वराज्य मिळाल्यानंतर काही काळ सातारा येथे वकिली करून ते 1952 पासून पूर्ण वेळ राजकारणात उतरले. द्वैभाषिक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही काळ पुरवठा मंत्री, त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही पुरवठा मंत्री, त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून 1956 ते 1960 त्यांनी काम केले, तर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवर ते स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 ते 1984 एवढा प्रदीर्घ काळ ते भारताचे संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र आणि व्यवहारमंत्री होते. तर काही काळ विरोधी पक्ष नेते, भारताचे उपपंतप्रधान होते. वय वर्षे सोळा ते वय वर्षे एकाहत्तर इतका काळ म्हणजे सुमारे साठ वर्षे देशसेवेत होते. यावरून त्यांच्या महान, त्यागी, समर्पित जीवनाची कल्पना येते.

                        खंबीर नेतृत्व :--

     सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले यशवंतरावजी अखिल भारतीय नेते झाले. हे त्यांचे असामान्यत्व आहेच. त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राचा उदय झाल्यावर नव्या महाराष्ट्राची जडणघडण त्यांनी केली हे त्यांचे महान कार्य आहे. कृषी-औद्योगिक समाजरचना, सहकारातून समाजप्रगती, विविध औद्योगिक वसाहती, सहकारी बॅंका, पतसंस्था, पूरक संस्था यांची उभारणी कोयनानगर सारखी मोठी धरणे व छोटी गाव-शेततळी योजना, जलसंधारण कामे, विभागीय विद्यापीठांची उभारणी लेखकांना उत्तेजन आणि पुरस्कार योजना, साहित्य संस्कृती मंडळ निर्मिती, विश्वकोष निर्मिती मंडळ, अशी चौफेर दृष्टी ठेवून केेलेली रचनात्मक कामे हे स्व. यशवंतरावजींचे कार्य कर्तृत्व आहे. निर्मितीक्षम प्रतिभा आहे. सामान्य लोकांचा समाजकारणात, राजकारणात सहभाग असावा म्हणून पंचायतराज, जिल्हा परिषद निर्मिती, स्थानिक नेतृत्वाला संधी व कार्यकर्तृत्वाचे डोंगर उभा करण्याचे आव्हान हे सारे यशवंतरावांनी आपल्या कार्यकाळात करून घडवून दाखविले. ही त्यांची महाराष्ट्राला मोठी देणगी आहे. त्यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यातून कर्तबगार नेतृत्वाचा उदय झाला आणि पुढे तेच महाराष्ट्राचे राज्यकर्ते बनण्याची एक अखंड साखळी तयार झाली, होत आहे. याचे सारे श्रेय स्व. चव्हाणसाहेबांनाच आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रातील कर्तबगार माणसे हाताशी धरून त्यांनी महाराष्ट्राची जडण-घडण केली. देशात महाराष्ट्र विकासाच्याबाबतीत सर्वप्रथम राहील याची दक्षता त्यांनी घेतली. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण हे आहेत. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आज महाराष्ट्र विकासाची घोडदौड करीत आहे हे त्यांचे द्रष्टेपण आहे.

--डॉ. श्रीपाद जोशी, जत (सांगली)
------------------------------

सोर्स : दैनिक ऐक्य.कॉम
----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सूत्रसंचालन.कॉम)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2022-रविवार.