महाराष्ट्र टाइम्स ब्लॉग्स-श्री.शैलेन्द्र तनपुरे-अ

Started by Atul Kaviraje, August 17, 2022, 07:59:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "महाराष्ट्र टाइम्स ब्लॉग्स"
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "महाराष्ट्र टाइम्स ब्लॉग्स" या ब्लॉग सदरात, श्री.शैलेन्द्र तनपुरे यांचा लेख.

शैलेन्द्र तनपुरे--
शैलेन्द्र तनपुरे हे महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक-जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक असून गेली ३२ वर्षे मराठी पत्रकारितेत आहेत. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दशकात आमूलाग्र बदल झाले. या नव्या बदलांचे तनपुरे साक्षीदार असून राज-का-रण या सदराद्वारे त्यांनी शहरातील राजकीय प्रवाहाची स्पंदने टिपली आहेत.
--------------------------------------------------------------------------

जगी सर्व सुखी असा कोण आहे?
शैलेन्द्र तनपुरे in राज-का-रण - राजकारण, सामाजिक
-----------------------------------------------
     
     मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजपच्या निष्ठावंतांना 'वेटिंग'वर ठेवून पक्षाला नेमके काय साधायचे आहे, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या पाच मंत्रिपदांचा आनंद मानायचा, की नाशिकमधून एकालाही मंत्रिपद मिळाले नाही याचे दु:ख करायचे, अशी त्यांची अवस्था झाली आहे.

     'जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूचि शोधून पाहे...' असे समर्थ सांगून गेले खरे; पण आजकाल प्रत्येकाला दुसरा आपल्यापेक्षा सुखी असल्याचा भास होतो. अगदी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मंत्री झालेल्यांना चांगले खाते मिळाले नाही, तरी दु:ख होत असते. तब्बल सव्वा महिन्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर समर्थांचा हा विचार कटाक्षाने समोर आला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५० आमदारांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला; त्यापैकी केवळ नऊ जणांना मंत्रिपद मिळाले, तर भारतीय जनता पक्षाचे १०६ आमदार असताना त्यांनाही तेवढीच मंत्रिपदे मिळाली. साहजिकच उर्वरित खट्टू झाले. या सत्तासंघर्षात उत्तर महाराष्ट्राचे चांगभले झाले; कारण प्रादेशिक समतोलातही या प्रदेशाला पाच मंत्रिपदे मिळाली. त्याचा आनंद मानायचा, की नाशिकमधून भाजपच्या एकालाही मंत्रिपद मिळाले नाही याचे दु:ख करायचे? नाशिकमध्ये शिंदे गटाचे केवळ दोन आमदार असताना दादा भुसे यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, ही समस्त भाजपेयींची व्यथा असणे समजू शकते.

     जयकुमार रावल यांना बाजूला सारल्याबद्दल संताप व्यक्त करायचा, की डॉ. विजयकुमार गावित यांचे प्रदीर्घ काळानंतर पुनर्वसन झाल्याबद्दल आनंद मानायचा? जळगावमध्ये गुलाबराव पाटीलच का? किशोर पाटील, चिमणराव पाटील यांना संधी का नाही, अशा प्रश्नांची उत्तरेही ज्याची त्याने शोधावीत. नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखेंना पर्याय नव्हताच, हे बरे झाले. इतर कोणत्याही विभागापेक्षा उत्तर महाराष्ट्राला अधिक मंत्रिपदे मिळवूनही इतराजी असेल, तर मग हा ज्याच्या त्याच्या सुखाच्या परिभाषेचा विषय झाला.

--शैलेन्द्र तनपुरे
Shailendra.Tanpure@timesgroup.com
------------------------------------------

         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ब्लॉग्स.महाराष्ट्र टाइम्स.इंडिया टाइम्स.कॉम)
        ---------------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.08.2022-बुधवार.