परदेशातही दिवाळी असते...

Started by mkapale, August 19, 2022, 08:20:22 AM

Previous topic - Next topic

mkapale

इथे लवाजमा नसला तरी सणवार असतो
मोठी रांगोळी नसली तरी मनात रंग असतो
रस्ते दिपलेले नसले तरी डोळ्यात चमक असते
भारतासारखी परदेशातही दिवाळी असतेच असते

खूप सारे फराळाचे पदार्थ कधी कधी नाही बनत
फटाक्यांचे मोठे डब्बे घराचा कोपरा नाही सजवत
दिवाळीच्या दिवसात हौस मौज मात्र तितकीच असते
सण दिसत नसला तरी त्याची जाणीव अंतरंगात सजते

नातेवाईकांची रेलचेल , मुलांची धांदल नसेल कदाचित
मात्र फोनवरच्या संभाषणात भावनांची उथम्बळ असते
सुट्टी जरी नसली तरी घरी आल्यावर सण साजरा होतो
मुहूर्ताची गल्लत झाली तरी देवपूजा मनापासूनच असते

कामं स्वतःच केल्याने कुटुंबाला सणाचं गांभीर्य असतं
दिखाव्यापेक्षा रीतिरिवाज जपायचा प्रयत्न जास्त असतो
सुखं शांतीची दिवाळी अनुभवावी खरंतर परदेशातच
त्या निमित्ताने नात्यांचा जिव्हाळा मायेने जपला जातो