मंदारविचार-मनोरंजनाचे घेतले व्रत:अशोक कुमार उर्फ दादामुनी-3

Started by Atul Kaviraje, August 22, 2022, 08:11:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मंदारविचार"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री मंदार जोशी, यांच्या "मंदारविचार" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "मनोरंजनाचे घेतले व्रत: अशोक कुमार उर्फ दादामुनी"

        मनोरंजनाचे घेतले व्रत: अशोक कुमार उर्फ दादामुनी--(लेख क्रमांक-3)--

     राज-देव-दिलीपच नव्हे, तर अमिताभ, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांसारखे अनेक लहानथोर सिनेस्टार आले आणि गेले, पण दादामुनींना त्यांच्या अढळपदावरून कुणीच हलवू शकलं नाही. आधी हीरो म्हणून राज्य केलेल्या अनेक अभिनेत्यांनी नंतर चरित्र भूमिका केल्या, पण कथानकाची गरज वगैरे बाबी आणि काही सन्माननीय अपवाद वगळता त्यांची सहज प्रवृत्ती ही नेहमीच इतर कलाकारांवर कुरघोडी करण्याची असल्याने एकूणच आयुष्याच्या उतरार्धात त्यांच्या कारकीर्दीला मर्यादा आल्या. याउलट दादामुनींनी मात्र कुठेही आपली भूमिका वरचढ न होऊ देता इतर कलाकारांना आपापली भूमिका फुलवायला संपूर्ण वाव देत स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यश मिळवलं. अगदी त्यांची प्रमुख किंवा अत्यंत महत्वाची भूमिका असलेल्या चित्रपटात सुद्धा त्यांनी याला अपवाद केला नाही. मग तो १९७८ सालचा राकेश रोशन बरोबरच्या 'खट्टा मीठा' मधला होमी मिस्त्री हा पारशी विधुर असो किंवा 'छोटीसी बात' मधल्या अरुण प्रदीपचा (अमोल पालेकर) 'गुरूजी' कर्नल ज्युलीअस नगेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग असो.

     चरित्र भूमिका करत हिंदी चित्रपटात जम बसवू पाहणार्‍या श्रीराम लागूंना आपल्याला मनाजोगत्या भूमिका मिळत नाहीत अशी नेहमी तक्रार असे. त्यांना एकदा दादामुनींनी त्यांच्या यशाचे रहस्य सांगताना समजावलं होतं की चित्रपटसृष्टीत सतत लोकांच्या डोळ्यांसमोर राहणं महत्वाचं आहे, त्यामुळे फार चिकित्सा न करता ज्या भूमिका मिळतील त्या स्वीकारत जावं. हव्या तशा भूमिका त्यातूनच मिळतात.

     दादामुनींना आपल्या कारकिर्दीत अनेक सटरफटर भूमिका जरी कराव्या लागल्या तरी अशा सकारात्मक वृत्तीमुळे साहजिकच त्यांना असंख्य वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिकाही मिळाल्या. याचा आणखी एक फायदा असा झाला की त्यांच्यावर कधी ज्याला साचेबद्ध (टाईपकास्ट) म्हणतात तसं होण्याची वेळ आली नाही.

     वर उल्लेख केलेल्या 'खूबसूरत' मध्ये प्रेमळ, सज्जन, सुनेवर मुलीसारखं प्रेम करणारा आणि शेवटी शिस्तीचा अतिरेक होतोय हे जाणवल्यावर बायकोला सुनावून भावी सुनेचीच बाजू घेणारा सासरा त्यांनी अगदी उत्तमरित्या उभा केला होता. 'मिली' मधे मुलीच्या जवळजवळ असाध्य असलेल्या आजाराने आतून व्यथित झालेला तरीही इतरांना धीर देणारा बाप साकारताना दादामुनी अमिताभइतकाच भाव खाऊन जातात. आशीर्वाद मधल्या जोगी ठाकूरची तडफड त्यांनी इतक्या ताकदीने उभी केली आहे, की हा सिनेमा पाहिल्यावर आपल्या पोटच्या पोरीचं लग्न लपुनछपून पाहण्याची वेळ आपल्या शत्रूवरही येऊ नये असं वाटल्यावाचून राहत नाही. त्याच सिनेमातलं त्यांच्याच आवाजातलं "रेलगाडी, रेलगाडी" कोण विसरू शकेल? हे गाणं आज भारतातलं पहिलं रॅप गाणं म्हणून ओळखलं जातं. पाकीजा मधला शहाबुद्दीन (आधी प्रियकर आणि मग बाप) आणि शौकीन मधला 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' या गाण्याची आठवण करुन देणारा चावट म्हातारा अशा दोन टोकं असलेल्या व्यक्तिरेखा त्यांनी जीव ओतून साकार केल्या.

     अगदीच साधारण असला, तरी व्हिक्टोरिया नंबर २०३ हा चित्रपट केवळ प्राण (राणा) आणि अशोक कुमार (राजा) या दोन कसलेल्या अभिनेत्यांच्या धमाल जोडीमुळेच हीट झाला. आजही ह्या चित्रपटाचा विषय निघाला की नायक-नायिके आधी हेच दोघे आठवतात. प्राण आणि अशोक कुमार या दोघांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेते म्हणून मिळालेले नामांकन हाच काय तो या सिनेमाचा फिल्मफेअर पुरस्कारांमधला सहभाग.

     अष्टपैलू अभिनेता हे विशेषण आजकाल सरसकट कुणालाही लावलं जातं. पण ज्यांनी गोल्डीचा 'ज्वेल थीफ' पाहिलाय त्यांना हे विशेषण अशोक कुमारला कसं शोभून दिसतं हे वेगळं सांगायची गरज भासणार नाही. हीरोगिरीवरुन 'दादा'गिरीकडे वळलेल्या अशोक कुमारने आपल्या नेहमीच्या 'इमेज'च्या विरोधात जात या चित्रपटात चक्क खलनायक साकारला. एवढंच नव्हे, तर त्या भूमिकेचं सोनं केलं, इतकं की हिंदी चित्रपटसृष्टी एका उत्कृष्ठ खलनायकाला मुकली असं तो चित्रपट पाहिल्यानंतर वाटू शकतं. चित्रपटाच्या शेवटी एक मजेशीर दृश्य आहे. नायक विनय (देव आनंद) मेला आहे असं समजून ज्वेल थीफ उर्फ प्रिन्स अमर (अशोक कुमार) हा आपला गाशा गुंडाळून कायमचा पळून जायच्या तयारीत असतो. त्याच वेळी विनय तिथे पोहोचतो आणि त्याच्यावर पिस्तुल रोखतो. आता हीरोने व्हिलनवर पिस्तुल रोखणे यात मजेशीर काय असं आपल्याला वाटू शकतं. पण खरी गंमत यानंतर आहे. विनयला जिवंत बघून धक्का बसलेल्या प्रिन्स अमर वर पिस्तुल रोखलेला विनय म्हणतो "....और फिर ऐसे बढिया बढिया अ‍ॅक्टरों की सोबत मे रह कर थोडी बहुत अ‍ॅक्टींग तो आदमी सीख ही जाता है." पुन्हा सिनेमा बघितलात तर हा सीन जरा बारकाईने बघा. हे दोघं अभिनय करत नसून एकमेकांशी खरंच बोलताहेत असा भास होतो. देव आनंदला जिद्दी मधे चमकवणार्‍या अशोक कुमारला ज्वेल थीफ मधे केलेला हा मानाचा मुजरा वाटतो. अर्थात, सदैव 'एव्हरग्रीन' रहाण्याच्या अट्टाहासामुळे देव आनंद दादामुनींकडून थोडीफार अ‍ॅक्टींग वगळता फारसं काही शिकला नसावा हे उघडच आहे.

--मंदार जोशी
------------
(December 28, 2010)
------------------------

                   (साभार आणि सौजन्य-मंदार विचार.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                  (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2022-सोमवार.