मंदारविचार-मनोरंजनाचे घेतले व्रत:अशोक कुमार उर्फ दादामुनी-5

Started by Atul Kaviraje, August 22, 2022, 08:16:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मंदारविचार"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री मंदार जोशी, यांच्या "मंदारविचार" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "मनोरंजनाचे घेतले व्रत: अशोक कुमार उर्फ दादामुनी"

        मनोरंजनाचे घेतले व्रत: अशोक कुमार उर्फ दादामुनी--(लेख क्रमांक-5)--

    दादामुनी पुढे म्हणतात, "तिची इच्छा अपूर्ण राहिल्याचा परिणाम म्हणून की काय, जाताना तिचे डोळे अर्धवट उघडे होते. मला कुणीतरी सांगितलं इच्छा अपूर्ण राहिल्यावर असं होतं म्हणे. मला माहीत होतं ती माझ्या प्रेमाला आसुसलेली होती. पण मी पूर्ण प्रयत्न करूनही तिचं व्यसन सोडवू शकलो नाही. विचित्र गोष्ट अशी, की मी तिच्या चेहर्‍याचं चुंबन घेतल्यावर तिचे डोळे पूर्णपणे मिटले. जणू आता कसलीच इच्छा राहिली नसावी." यानंतर दादामुनींनी चित्रपटात काम करणं जवळ जवळ बंद केलं.

     माणसाने किती दुर्दैवी असावं? ज्यांनी त्यांना खांदा द्यायचा त्याच दोन्ही धाकट्या भावांचा मृत्यु त्यांना बघावा लागला. १३ ऑक्टोबर १९८७ या दिवशी दादामुनींचा वाढदिवशीच किशोर कुमारचं निधन झाल्यापासून त्यांनी आपला वाढदिवस साजरा करणंही सोडून दिलं. मग १९९७ साली २० सप्टेंबर रोजी अनुपही हे जग सोडून गेला.

     काकाआजोबा मी आठवीत असताना, म्हणजे १९९१ साली वयाच्या ६४व्या वर्षी हे जग सोडून गेले. काकाआजोबा गेल्यानंतर मी जेव्हा जेव्हा मी दादामुनींना सिनेमात बघत असे तेव्हा तेव्हा मला आजोबांची जास्तच आठवण येत असे आणि मग दादामुनींचा सहभाग असलेली दृश्ये अधिकच समरस होऊन बघितली जात. माणूस कशात आणि कोणात नात्यांची पोकळी भरून काढायला भावनिक आधार शोधेल सांगता येत नाही. कदाचित फ्रॉइडकडे याची उत्तरं असू शकतील.

     मला तीन लोकांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा होती. पुलंना मी भेटलो. सचिन तेंडुलकरला कधीतरी भेटेन, फक्त हात लाऊन बघता आला तरी चालेल. पण दादामुनींना भेटण्याचं स्वप्न मात्र स्वप्नच राहिलं. स्वतः होमिओपथीचे तज्ञ असलेले दादामुनी मात्र अनेक वर्ष दम्याशी झुंज दिल्यावर थकले होते. त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानंतर दोनच महिन्यांनी त्यांनी १० डिसेंबर २००१ रोजी ह्या जगाचा निरोप घेतला. मी फक्त दोनदा भरपूर रडल्याचं मला आठवतंय. एकदा काकाआजोबा गेल्यावर आणि दुसर्‍यांदा माझे हे सिनेमातले आजोबा देवबाप्पाला भेटायला निघून गेले तेव्हा.

--मंदार जोशी
------------
(December 28, 2010)
-------------------------

                    (साभार आणि सौजन्य-मंदार विचार.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                  (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2022-सोमवार.