मराठीप्रेमी-home ! घर असावे घरासारखे !

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 08:19:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "मराठीप्रेमी"
                                       ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मराठीप्रेमी" या ब्लॉग मधील "सोशल कॅटेगरी"सदरातील एक लेख एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "home ! घर असावे घरासारखे !"

                   home ! घर असावे घरासारखे !--

     पुण्यात असतो तेव्हा एकदोन महिन्यानी शिवथरघळ येथे जाणं होतं. मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठान ची संकल्पना राबवणारे सुधाकरशेठ, त्यांना मनापासून साथ देणारे त्यांचे मित्रवर्य स्मॅश इलेक्ट्रिकल्सचे संचालक चितळे,अरिहन्त इलेक्ट्रिकल्सचे संचालक ओसवाल अशी मोजकीच मंडळी बरोबर असतात. मोफत प्रशिक्षण प्रतिष्ठानची संकल्पना प्रत्यक्ष राबवण्यासाठी महाड जवळील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची मोलाची मदत होत आहे. त्यांच्या कामाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने तेथे वारंवार जाणं घडतं. या कामात त्यांना आमची काही मदत हवी असेल तर ती देण्यात येते ,काही अडचणी असतील तर त्यांचं निवारण करण्यात येते. हे काम झालं कि आमचा मोर्चा आपोआप शिवथरघळकडे समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी वळतो.

     रविवारी शिवथरघळला जायला कधी जमत नाही.बहुतेक तो वार शनिवार किंवा सोमवार असाच असतो.या दिवशी घळीत फारशी गर्दी कधी जाणवली नाही. त्यामुळे अगदी निवांतपणे घळीचं दर्शन घेणं जमतं. मन कसं प्रसन्न होतं तिथल्या शांत शांत आणि थंडगार वातावरणामुळे. समर्थांनी तिनसाडेतिनशे वर्षापुर्वी या घळीत बसून दासबोधाचे लेखन केले.कसं केलं असेल हे सर्व ? दिव्याची व्यवस्था काय केली असावी ? त्याकाळी या जागी निबिड अरण्य असावे,वन्य पशुपक्षी यांचा वावर असावा. त्यांचा बंदोबस्त कसा केला असावा? असे अनेक प्रश्न मनात येतात.

     सोळाशेसाठ प्रश्नांचं ओझं मनात घेऊन मी अनेकदा तेथे गेलो, आणि मग दरवेळी घळीत समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेऊन झाल्यावर जवळच असलेल्या मोठ्या सभाग्रहात जाऊन तेथे लावलेल्या फलकांचे मन लावून वाचन करु लागलो. हे असं नेहमीच घडत असे. इतकं प्रभावी असे त्या फलकावर काय आहे ? अस मनात येणं स्वाभाविक आहे.

     तन,मन एक करून ,अत्यंत एकाग्रचित्ताने मी दरवेळी त्या फलकावरील उपदेशरुपी लेखांचं वाचन करत असतो. त्यापैकी एक असतं "घर असावे घरासारखे —-" या कवितेचं. पुण्याच्या विमल लिमये यांची ही कविता. मध्यंतरी ही कविता मी माझ्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना विरोपाने पाठवून दिली.या कवितेचा समावेश सुधाकरशेठ यांनी "संस्कारधन" या पुस्तकात केला आहे.ते ही पुस्तके प्राथमिक,माध्यमिक शाळेतील मुलांना मोफत वाटत आहेत. अनायासे मुलांना आणि त्यांच्याबरोबर मोठ्यांनाही  "घर कसे असावे—" याचा पाठ या संस्कारधनाच्या माध्यमातून मिळत आहे. या घरात नुसत्या भिंती नकोत तर तेथे जिव्हाळा,प्रेम सांभाळणारी नाती हवीत. अर्थपूर्ण बोलणं हवं. या घरात सुरेल गाणी असावीत, नुसती खुळखुळणारी नाणी नकोत तर त्याना स्वकष्टाचा,सदाचराचा सुगंध असावा, डोळ्यातून येणारे अश्रू हे नुसते नक्राश्रू नसावेत तर त्या अश्रूत खरीखुरी प्रीत असावी,जिव्हाळा असावा आणि या घरातून बाहेर पडणारे पिल्लु दिव्य शक्तियुक्त अशा स्वबळाने या जगात भरारी घेणारे असावं,घराचे नांव उज्ज्वल करणारं असावं,हरिभक्तपरायण असावं असं मोजकं मनोगत व्यक्त करणारी ही कविता मनाचा ठाव घेते. प्रत्येकाने आपल्या घरातील भिंतीवर आवर्जुन लावावी अशी ही संस्कारक्षम पवित्र कविता !

     मनाचे श्लोक अनेकदा वाचावेत,अनुभवावेत असेच आहेत. कसलाही संभ्रम असेल तर खुशाल मनाचे श्लोक वाचू लागा, मन शांत होईल. किंवा अजून काही अध्यात्मिक वाचन करा, मन आपोआप शांत होईल.

     अगदी असाच संदेश देणारी "घरात काय असावे? " ही दुसरी कविता येथे फलकावर झळकत आहे. या कवितेचा समावेशही [Arvind Nerkar's]"संस्कारधन" या पुस्तकात सुधाकरशेठ यानी केला आहे. ही कविता कोणी लिहिली आहे त्यांचा उल्लेख येथे केलेला नाही. गेली अनेक वर्ष मी ती शिवथरघळ येथे पाहतोय. ही संपूर्ण कविता मी आपल्या माहितीसाठी देत आहे.--

केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये
आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये॥धृ॥

येणार्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी
जाणार्याच्या मनात फिरुनी, येण्याविषयी ओढ हवी
ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वाहावा मनामध्ये॥१॥

लहान मोठी भांडी सारी, फिरत असती घरामध्ये
भांड्याला लागतेच भांडे, विसरूनी जावे क्षणामध्ये
परस्परांना समजून घ्यावे, अढी नसावी मनामध्ये॥२॥

नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या व्यक्तींची
ज्याची त्याला द्यावी जागा, वयाप्रमाणे मानाची
एकमताने निर्णय घ्यावा, नको दुरावा मनामध्ये॥३॥

लळा, जिव्हाळा आत असावा,नको उमाळा वरकरणी
नको कुणाला गर्व धनाचा,लीन रहावे प्रभुचरणी
दिवसा रात्री परमेशाचा ध्यास असावा घरामध्ये ॥४॥

--मराठीप्रेमी
(07/07/2010)
----------------

                     (साभार आणि सौजन्य-सावधान.वर्डप्रेस.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    ----------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.