अशी मी, मनातलं...!-स्वातंत्र्यानंतर

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 08:45:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "अशी मी, मनातलं...!"
                                   ----------------------

     आज वाचूया, श्रीमती जयश्री अंबासकर यांच्या "अशी मी, मनातलं...!" या ब्लॉगमधील एक कविता . या कवितेचे शीर्षक आहे- "स्वातंत्र्यानंतर"

                        ७६वा स्वातंत्र्य दिन--

     आपल्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी असंख्य कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. प्रत्येक शाळांमधे सुध्दा उत्साहाने कार्यक्रम झालेत. माझ्यासाठी समाधान आणि आनंद देणारा छोटासा कार्यक्रम नागपुरच्या न्यू इंग्लिश हायस्कूल मधे सादर करण्यात आला. माझी बहीण Rucha Ansingkar हिने पुढाकार घेऊन मी लिहिलेल्या "स्वातंत्र्यानंतर" ह्या कवितेचं मुलांना घेऊन सुरेख सादरीकरण केलं.

                        स्वातंत्र्यानंतर.....

किती आहुती दिल्या, घेतल्या, स्वातंत्र्याच्या संग्रामाने
किती राहिल्या, विरून गेल्या, कितीक जपल्या इतिहासाने

किती करावे हिशेब आता, मोजदाद तर अशक्य केवळ
प्राणपणाने अता जपूया स्वातंत्र्याची निर्मळ खळखळ

ज्योत अंतरी तेवत ठेवू, त्यागाची अन् बलिदानाची
अभिमानाने फडकत ठेवू उंच निशाणी स्वातंत्र्याची

मशाल घेऊन इतिहासाची, उजळत नेऊ वाट उद्याची
प्रगती पथावर चालत राहू, प्रतिमा उजळू या देशाची

समूळ आपण उपटुन काढू, विषवल्ली जातीधर्माची
सत्तेसाठी हपापलेल्या, भ्रष्ट, लालची अन् नेत्यांची

व्रत घेऊया एकच हाती, देशाच्या या अखंडतेचे
विळख्यातुन जातीधर्माच्या, देशाला या सोडवण्याचे

परस्परातील प्रेम जिव्हाळा, आपुलकीने जपू, वाढवू
देशभक्तीची ज्वाला हृदयी, सदैव अपुल्या जागत ठेवू

--जयश्री अंबासकर
(ऑगस्ट 15, 2022)
-------------------

                      (साभार आणि सौजन्य-जयवी.वर्डप्रेस.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                     --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.