कथा पौर्णिमा-S S-SELF SERVICE

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 08:47:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "कथा पौर्णिमा"
                                      --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्रीमती पूनम, यांच्या "कथा पौर्णिमा" या ब्लॉगमधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "S S-SELF SERVICE"

                      S S-SELF SERVICE--

     मी पाच वर्ष स. प. महाविद्यालयाची विद्यार्थिनी असूनही, आणि वर्गात जरी हजेरी लावलेली नसली, तरी नियमितपणे कॉलेजला हजेरी लावलेली असूनही, एकदाही स. प. च्या कॅन्टीनमध्ये पायही ठेवलेला नाही! कॅन्टीन कुठे आहे हे फक्त माहित आहे (कारण बाहेर पाटी आहे!) पण कॅन्टीन कसं आहे हे मात्र अजिबात माहित नाही. ते कसं काय?- असा आश्चर्ययुक्त प्रश्न काही जणांना पडेल, आणि काही जणांना मुळीच पडणार नाही. कारण, त्याचं उत्तर त्यांनाही माहित आहे. उत्तर आहे SS!😀

     अकरावीला आमचा मैत्रिणींचा ग्रुप जसा आपोआपच तयार झाला, अगदी तसाच आमचा मैत्रिणींना ग्रुप असाच, आपोआपच  SSला जायला लागला. आम्ही तिथे कशा गेलो, केव्हापासून जायला लागलो, कॅन्टीनला का नाही गेलो या प्रश्नांची उत्तरं मला अजिबात आठवत नाहीत. पण आमच्यासाठी  SS हेच कॅन्टीन होतं. अकरावी-बारावीला कॉलेज दुपारी असायचं, क्लास सकाळी. सगळ्या मैत्रिणी डबा घेऊन यायच्या. पण डबा खाऊन आम्ही परत  SSला जायचोच! का? तर चहा प्यायला! आम्ही टिपिकल मध्यमवर्गीय, संस्कारी मुली! त्यामुळे दहावीपर्यंत शहाण्यासारख्या दूध प्यायचो! चहाची चटक लागली SS मुळे! फार मस्त चहा असायचा, आणि किंमत माहित्ये- सव्वा रुपया! वडापाव आणि सामोसापाव दोन रुपये. सो, सव्वा प्लस दोन असे सव्वातीन आणि पंचवीस पैशांचा एक गमबॉल- असं वट्ट साडेतीन रुपयात पोटभर खाणं व्हायचं! गप्पा, गॉसिप्स, 'बघाबघी' अलग! सांगा, का नाही जाणार आम्ही  SSमध्ये, रोज?😜

     या टपरीला अधिकृत नावच नव्हतं. तिथे काऊन्टरला ऑर्डर दिली की सेल्फ सर्व्हिस असायची, म्हणून टपरीचंच नाव पडलं  SS! एक तर स्वस्त आणि दुसरं म्हणजे बसायला भरपूर जागा आणि त्रिकोणी स्टुलं! शिवाय कोणीही कधीही हाकलायला यायचं नाही. कितीही वेळ बसा. एका चहावर दोनदोन तासही बसता यायचं. सांगा, का नाही जाणार आम्ही  SSमध्ये, रोज? 😇

     ज्युनिअर कॉलेजला असताना दुपारी आणि नंतर सिनियर कॉलेजला असताना सकाळी SSला चक्कर व्हायचीच. म्हणजे इतकं सवयीचं होतं ते, की कॉलेजमध्ये कोणी नसेल, तर तो किंवा ती हमखास SSमध्ये सापडायचा/ची. इतर कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी आले, की त्यांनाही आम्ही अप्रूपानं तिकडे घेऊन जायचो. सु.शि.च्या कादंबऱ्यांमध्ये स.प.चं कॅन्टीन, बादशाही वगैरेला जसं वलय होतं, तसं आमच्या काळात SSला होतं. त्या खडबडीत जमिनीवरच्या लडखडत्या स्टुलांवर बसून कित्येक 'प्रपोज केले' गेले, कित्येक 'वाटाघाटी' झाल्या, फिसकटल्या, सूत जमलं, बिनसलं, मैत्री झाली, पहिल्यावहिल्या 'ठरवून' भेटी झाल्या...  SS was a pretty romantic place too!💓

     मग कॉलेज सुटलं, आयुष्य बदललं. हिंडून फिरून गाडी परत आली भोपळे चौकातच. सगळी चांगली हॉटेलं, रेस्तरां फिरून झाल्यावर परत एकदा आठवण आली टपरीचीच. कुतुहलानं गेले, तर अक्षरश: काळ गोठला होता तिथे. (हे मी पोस्ट ऑफिसबद्दल म्हणते सहसा. पण आता तीही कात टाकत आहेत, सध्याच्या पोस्टात चक्क उजेडबिजेड असतो!) तीच ती ताडपत्री, तोच तो कळकटपणा आणि तीच्च ती स्टुलं! काऊन्टरवरची माणसं बदलली आणि अर्थात बदलले आहेत चहा आणि वडापावचे दर! पण चव तीच. महोल तोच. आता, कोणी तयार असेल, तर मी व्यावसायिक भेटीही तिथे करते! आणि कधीकधी तर एकटीही तिथे जाते. जाम मजा येते.

     माझी कॉलेजमधली आणि आता अमेरिकेला असलेली एक मैत्रिण सुट्टीला आली होती. कुठे भेटायचं? मी सहज विचारलं, SSचालेल का? तीही आनंदानं हो म्हणाली. म्हणलं, अगं बाई, ते तसंच आहे, जुनं. ती म्हणाली, तसंच हवं आहे! खूप चकचकीतपणा पाहिला, पाहत आहे. आता जुनेपणाच पहायचा, अनुभवायचा आहे. मग, सांगा, का नाही जाणार आम्ही  SSमध्ये? गेलोच. आणि अर्थात खूप खूप नव्या जुन्या आठवणींमध्ये बुडूनही गेलो.😊 मग इतकं सगळं दाटून आलं, की एकदाचं लिहून काढलं. आता बरं वाटतंय. तुम्हीही कोणी SS प्रेमी असाल, तर सांगा तुमचेही अनुभव. आणि हो, आपला कधी भेटायचा योग आला, तर SSलाच भेटूया. काय म्हणता?

--पूनम 
(June 15, 2022)
------------------

                 (साभार आणि सौजन्य-कथा पौर्णिमा.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.