पाषाणभेदाची जालवही-लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक-(लेख क्रमांक-2)

Started by Atul Kaviraje, August 28, 2022, 08:54:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "पाषाणभेदाची जालवही"
                                  ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, पाषाणभेद यांच्या "पाषाणभेदाची जालवही" या ब्लॉगमधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक--"

         लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक--(लेख क्रमांक-2)--

पाषाणभेद: तुम्ही कोठेकोठे भ्रमण केले आहे? किंवा कुठकूठली ठिकाणे पाहीलेली आहेत?

लयाजी : नाशिक-इंदूर- उजैन-ओंकरेश्वर-खंडवा, नाशिक-महाबळेश्वर-गोवा, नाशिक-शेगाव, परळी वैजनाथ, शिरडी, अक्कलकोट, तुळजापूर, घॄष्णेश्वर, भिमाशंकर, गोवा, हुबळी, गोकर्ण, नाशिक -कन्याकूमारी, हैदराबाद, तिरूपती, श्री. शैल्यम, रामेश्वर तसेच त्रंबकेश्वर, वणी, बडोदा, सुरत, गिरणार, द्वारका, राजकोट, सोमनाथ आदी ठिकाणी मी सायकलवर भटकलेलो आहे. तसेच मागच्या वर्षी (वय ७१) एकटा नाशिक-उजैन सायकलवर फिरून आलो आहे. थोडक्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी ९ मी सायकलवर फिरलेलो आहे. बाकीचे ३, बद्रिनाथ, काशी, वैजनाथ मी ४धाम यात्रेत बसने फिरलेलो आहे.

पाषाणभेद: प्रवासात काय काळजी घ्यायचे? काही शारिरीक त्रास झाला का?

लयाजी : मी भगवंताला मानतो. तोच बुद्धी देतो. त्यामूळे काही काळजी नव्हती. प्रवासात काही त्रास झाला नाही. अहो सायकल पंक्चरपण झालेली नव्हती कधी.
माझी जुनी सायकल तिन चार वर्षांपुर्वी चोरीला गेली. दुसरी सायकल मित्राने दिली. ती सायकलही अजुनही पंक्चर झालेली नाही. तिच्यावरच मी मागच्याच वर्षी उजैन, ओंकारेश्वरला जावून आलेलो आहे. आता बोला. पाय दुखले तर आयोडेक्स चोळायचो. बास. बाकी अजूनही मी नाशकात सायकलवरच फिरतो. प्रकृती ठणठणीत आहे.

पाषाणभेद: प्रवासातली एखादी आठवण सांगा.

लयाजी : एकदा प्रवासात दिवस मावळला व आम्ही तरीही पुढे गेलो. अंधार पडल्यावर ३०० मिटर पुढे आम्हाला शेकोटी/ जाळ दिसला. आम्ही तेथेच मुक्काम केला. सकाळी उठून पहातो तर ते स्मशान होते.

पाषाणभेद: खरे आहे. आपल्या सगळ्यांना तेथे एकदा जायचेच आहे तर भिती कसली? बाकी प्रवासात काही अपघात वैगेरे?

लयाजी : अपघात वैगेरे काही झाले नाही. फक्त एकदा जोडीदार थोरात काका रस्त्यावरच्या मोरीवरून खाली पडले होते. मी पुढे होतो. मला मागून आवाज आला. बघतो तर थोरातकाका पडलेले. नशिबाने काही लागलेले नव्हते.

पाषाणभेद: आणखी एखादी आठवण सांगा ना.

लयाजी : कोल्हापूरच्या पुढे असतांना त्यावेळी ईंदिराबाईंची हत्या झालेली होती. सगळीकडे गंभीर परिस्थीती होती. वाटेत बंदोबस्ताला असणार्‍या ईंन्पेक्टर साहेबांनी आम्हाला मागे जायला सांगीतले. मी त्यांना आम्हाला पुढे जाण्यासाठी विनंती केली. ते काही सोडेनाच. मग मी त्यांना नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग मधिल अधीकार्‍यांची नावे सांगीतली. त्यानंतर त्यांनी आम्हाला बसवून चहा पाजला. आमचा पत्ता दिला. त्यांनी आम्हाला १०० रुपये खर्चासाठी दिले. त्या १०० रुपयाचा आम्ही महादेवाला अभिषेक करून त्याची पावती त्यांना त्यांच्या पोलिस स्टेशनला पाठवली. काही वर्षंनंतर ते साहेब नाशिकला अस्थीविसर्जनासाठी आले असता आमच्या अशोकस्तंभ मंडळाने त्यांची सोय केली होती.

पाषाणभेद: तुमच्या सामाजिक कामाबद्दल काही बोला.

लयाजी : मी पडलो गरीब माणूस. तरीही आमच्या परीसरात मी एक पाणपोई १९८८ साली बांधली. आजही त्यातले पाणी गरजू लोकं घेतात. महादेवाचे मंदीर १९९९ साली बांधले.

त्यानंतर आम्ही पाणपोई व मंदिर बघीतले. गोदावरीच्या काठी असलेले मंदिर छोटेसे पण छान आहे. आजूबाजूला झाडी लावलेली आहेत. बेलफळाचे झाड आहे. बाजूलाच स्वामी समर्थांचे पण मंदिर मागच्या २ वर्षांपुर्वी बांधलेले आहे. त्या मंदिराच्या वरती असलेल्या पिंपळात गणपतीचा आकार तयार झालेला अहिरेबाबांनी दाखवला. सकाळसंध्याकाळ मंदिराची व्यवस्था, दिवा, पणती लावणे बाबाच करतात. अनेक सामाजीक कामात ते भाग घेतात. 'अशोकस्तंभ मित्र मंडळाचे' ते सक्रिय कार्यकर्त आहेत.

दर्शन घेवून परत आम्ही त्यांच्या घरी आलो.

पाषाणभेद: तुम्हाला काही व्यसन? शौक?

लयाजी : नाही. काहीच व्यसन नाही. अगदी तंबाखुचेपण नाही. शौक फक्त सायकल चालवण्याचा आहे. पुर्वी मित्रांबरोबर कधितरी बसणे व्हायचे पण आता २५/ ३० वर्षांत ते पण नाही. मांस मच्छी पण खात नाही.

पाषाणभेद: आता पुढचा कार्यक्रम कधी?

लयाजी : आता पुढच्या महिन्यात परत एखाद्या सायकल मोहिमेवर निघणार आहे.

     त्यानंतर लयाजी बाबांनी मला त्यांचे मिळालेले पुरस्कार दाखवले त्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा २००९ साली मिळालेला 'आदर्श समाजसेवक' पुरस्कार होता, अगणित प्रशस्तीपत्रके होती.

     अहिरे बाबांना मी मंदिरात होणार्‍या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात भेटण्याचे आश्वासन देवून मी त्यांचा निरोप घेतला.

--पाषाणभेद
(TUESDAY, NOVEMBER 3, 2009)
------------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-पाषाणभेद.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2022-रविवार.