अरविंद तेलकर-वाट कठीण मकरंदगडाची...-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:19:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "अरविंद तेलकर"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अरविंद तेलकर, यांच्या ब्लॉग मधील "अरविंद" या सदरा-अंतर्गत  एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "वाट कठीण मकरंदगडाची..."

                   "वाट कठीण मकरंदगडाची..."-लेख क्रमांक-१--
                  -----------------------------------------

     ऐनवेळी बदललेला बेत एक थरारक अनुभव पदरात टाकून जाईल याची आम्हाला तेव्हा कल्पनाच नव्हती ! ऐन पावसात एकांतातल्या रांगड्या मकरंदगडाने दिलेल्या त्या धमाल अनुभवाबद्दल त्याच्या ऋणात राहणंच मी पसंत करेन...

     आधी बेत ठरला होता चंद्रगड ऊर्फ रामचंद्रगडावर जाण्याचा. नेटवरचे चंद्रगडाचे फोटो पाहून आणि त्याचे कातिल रूपडे पाहून आम्ही खुळावलो होतो. चंद्रगडाचा परिसर असला असेल, तर खुद्द गडावर काय स्थिती असेल या कल्पनेनेही कधी एकदा त्या गडावर स्वारी करतो अशी आमची स्थिती झाली होती. महाबळेश्‍वरहूनही चंद्रगडाला जाता येत असल्याची माहिती आमच्या एका भटक्‍या मित्राने दिली होती आणि त्यासाठी एका पूर्ण दिवसाची तंगडतोड करावी लागत असल्याचंही तो बोलला होता. ऐन पावसाळ्यात दरीत उतरण्याच्या कल्पनेमने मी तर खचलोच होतो. बाकी मंडळी तयार होती; पण संपूर्ण एक दिवस तंगडतोड आणि रात्री मुक्कामाएवढा वेळ नसल्याने सरळ दुसऱ्या मार्गाने जावं असं ठरलं. चंद्रगडावर जाण्यासाठी वाई-जोर-ढवळ्याघाट-ढवळ्या गाव-चंद्रगड असा दुसरा मार्ग शोधाशोधीत कळाला होता. त्याच रस्त्याने जाण्याचा निर्णय पक्का झाला. नेहमीप्रमाणे रविवारचा बेत ठरला. यावेळी एक नवा भिडू आमच्या टोळक्‍यात सामील झाला होता आणि पहिल्याच ट्रेकमध्ये एक थरारक अनुभव त्याच्या पदरात पडला. ठरल्यावेळी आम्ही जमलो आणि (नेहमीप्रमाणे) मिसळ-चहाला न्याय देऊन सातारा रस्त्याने मार्गी लागलो.

     गाडी धावत असताना चंद्रगडाबाबत चर्चा सुरू झाली. ढवळ्या घाटातून गाडी जाऊ शकत नसल्याचं वर्तमान एका मित्राने दिल्यावर काय करावं असा प्रश्‍न पडला. सुदैवाने या मित्राने महाबळेश्‍वरचं एक जुनंपानं पॅंप्लेट आणलं होतं नि ते पाहत असताना प्रतापगडाजवळचा मकरंदगड पाहता येईल हे लक्षात आलं. आमच्यापैकी कोणी कधी मकरंदगडाला गेला नव्हता. मी फक्त त्या गडाबाबत ऐकलं होतं आणि य वर्षांपूर्वी केलेल्या अशाच एका ट्रेकमध्ये घोड्याच्या खोगिराप्रमाणे दिसणाऱ्या या गडाचं लांबून दर्शन घेतल्याचं लक्षात आलं.

     झालं. बेत बदलला आणि वाईकडे वळू पाहणारी गाडीची चाकं महाबळेश्‍वरच्या घाटाकडे सरकली. महाबळेश्‍वर पार करून आम्ही आंबेनळीच्या घाटात शिरलो. आता माहितीनुसार पुढे पार हे गाव आणि तेथून पुढे मकरंदगड. गाडी पारच्या फाट्यावरून वळाली तेव्हा पहिल्याच पुलावर काही पोरं खेकडे पकडण्याच्या मोहिमेत गुंतलेली दिसली. त्यांना माहिती विचारल्यावर सरळ पारकडे जावा हे उत्तर मिळालं. रस्ता मस्तच होता. दोन्ही बाजूंना दाट झाडी. कधी डाव्या हाताला खोल दरी आणि डोंगरांचे सुळके असा तो मार्ग होता. रस्त्यावर उजवीकडे पार गावाची पाटी दिसल्यावर आम्ही तिकडे वळालो. या भागात पावसाची कृपादृष्टी असल्यामुळे सगळीकडे खलास हिरवाई होती. मध्ये एका ठिकाणी थांबलो तेव्हा कळलावी फुलाचं नि नंतर एका देखण्या फुलपाखराची सुरेख छायाचित्रे मिळाली. गावात पोचल्यावर मकरंदगड पार विरुद्ध दिशेला असल्याची माहिती मिळाली आणि अबौटटर्न करत पुन्हा आम्ही रस्त्याला लागलो. शिरवली-हातलोट रस्त्याने जायचं होतं. निघालो. हातलोटच्या अलिकडे एक लैच फर्मास जागा भेटली.

--अरविंद तेलकर
(Friday, February 12, 2010)
-------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-अरविंद तेलकर.योला साईट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.