अरविंद तेलकर-वाट कठीण मकरंदगडाची...-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:21:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "अरविंद तेलकर"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अरविंद तेलकर, यांच्या ब्लॉग मधील "अरविंद" या सदरा-अंतर्गत  एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "वाट कठीण मकरंदगडाची..."

                    "वाट कठीण मकरंदगडाची..."-लेख क्रमांक-2--
                   -----------------------------------------

     दाट जंगल नि मधून जाणारा एकाकी शांत रस्ता. झाडं एवढी उंची आणि दाट होती, की भरदिवसाही तेथे अंधारलं होतं. त्या जागेला आम्ही अंधारबन असं नाव देऊन टाकलं. फोटो काढण्यात जरा जास्तच वेळ गेल्याचं लक्षात आल्यावर मात्र घाई करून निघालो. हातलोट दिसायला लागलं आणि डावीकडे मकरंदगड सामोरा आला. खरं तर मधु-मकरंदगड असे हे जोड किल्ले आहेत. पण मधुगडावर जायला रस्ता राहिला नसल्याचं समजल्याने फक्त मकरंदगडावर जायचं पक्कं केलं. गावात शिरलो आणि पाऊस अक्षरशः कोसळायला लागला. गावातले एक भगवंतराव बरोबर यायला तयार झाले. भर पावसात रस्त्याला लागलो. मकंरदगड तसा फार अवघड वगैरे नाही. रस्ताही दाट जंगलातून जातो. वाट म्हणजे केवळ सुख.

     सभोवताली पसरलेली हिरवीगार भात शेती, त्यात लाल कौलांचीछोटी घरं, मधून जाणारी चिखलाची पायवाट आणि मागे ढगांचा बुरखा पांघरलेला टंगाळ्या मकरंदगड. निसर्गाचा एक भव्य कॅनव्हास समोर उलगडला होता. त्यात बुडून जाणं हेच शहाणपणाचं लक्षण. चढणीला लागलो तेव्हा भगवंतरावांनी जळवांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्याचं प्रत्यंतर काही वेळातच आलं. नव्याने सामील झालेल्या उमेशवर एका जळवेने हल्ला केला. पहिल्यांदा काही लक्षात आलं नाही; पण वाटाड्याची नजर बारीक असल्याने त्याने ती जळूबाई काढली. मग बाकीचेही सावध झाले. रस्ता चढणीचा होत होता आणि आम्ही चालत होतो. जंगलात गवे भरपूर असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही जरा जास्तच खूश झालो होतो. प्रत्यक्षात गवा सामोरा आला असता तर काय झालं असतं ही वेगळी बाब! वाटेत भूछत्रांनी लगडलेलं एक झाड माझापण फोटू काढा म्हणत सामोरं आलं. कसली भूछत्रं लगडली होती त्या झाडाला. फोटो अपरिहार्यच होते. आता वाट सरळ पठारावरून जात होती. मी आणि राकेश पुढे होतो. अचानक एका वळणावर पंखांचा फडफडाट ऐकू आला आणि समोरच एका देखण्या रानकोंबड्याने पंख फलकावत खालच्या दरीतल्या जंगलात सूर मारला. एवढ्या वेगाने तो गडी पळाला, की कॅमेरे असूनही आम्ही काही करू शकलो नाही. वाटेतल्या एका ओहोळात लालभडक खेकडेबुवा नांग्या सरसावून उभे होते. आम्ही जावळ गेल्यावर मात्र ते बुवा पळाले आणि एका खडकाबुडी त्यांनी आश्रय घेतला. आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं छायाचित्रण केलं.

     वाटेचा पहिला टप्पा आता संपला होता. समोर होतं घोणसूर. याला सरळ घोणसपूरही म्हणतात. घोणसूरचं मल्लिकार्जुनाचं देऊळ समोर उभं होतं. आता शिरलो. मस्त न्याहारी केली, पाणी ढोसून हुषार झालो नि पुढल्या वाटेला चालू पडलो. समोर मकरंदगड दिसत होता; पण वाट मुरमाची नि चढणीची होती. सटकत, आधार घेत जात राहिलो. समोर भलं मोठं बुरजाप्रमाणे टेंगूळ दिसत होतं; पण वाट त्याच्या उजवीकडून होती. बाजूला दरी, डावीकडे कडा आणि मधून वाट असा प्रकार. गेलो. अखेर एकदाचे मकरंदगडावर पोहोचलो. भगवंतरावांनी आम्हाला थेट पाण्याच्या टाक्‍याकडे नेलं. तसं या गडावर आता काही बांधकाम शिल्लकही नाही. टाक्‍यातल्या थंड आणि नितळ पाण्याने आमचे श्रम विसरायला लावले.

--अरविंद तेलकर
(Friday, February 12, 2010)
-------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-अरविंद तेलकर.योला साईट.कॉम)
                                  (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.