अरविंद तेलकर-वाट कठीण मकरंदगडाची...-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:23:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "अरविंद तेलकर"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अरविंद तेलकर, यांच्या ब्लॉग मधील "अरविंद" या सदरा-अंतर्गत  एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "वाट कठीण मकरंदगडाची..."

                    "वाट कठीण मकरंदगडाची..."-लेख क्रमांक-3--
                   -----------------------------------------

     आता खरी परीक्षा सुरू होणार होती...पाण्याच्या टाक्‍याच्या वरच्या बाजूला शंकराचं एक मंदिर आहे. त्याला जायला दोन वाटा आहेत. एक जरा लांबून फिरून जाते; पण सुरक्षित आहे. दुसरी वाट भगवंतरावांसारख्या स्थानिकांचा शॉर्टकट असला, तरी आपल्यासारख्यांची पुरती वाट लावणारी आहे. (अर्थात ही बाब आम्हाला वाटेला लागल्यावर लक्षात आली) वाटाडे मामा पुढे निघाले. टाक्‍याच्या शेजारूनच हा शॉर्टकट जातो. ही वाट म्हणजे कड्याच्या उतारावरचे उंच खडक आणि गवतातून जाणारा मार्ग आहे. "जरा जपून यावा बरं का,' म्हणत मामा वाटेने चढायला लागले. एकावेळी एक भिडू जाऊ शकेल एवढीच वाटेची रूंदी. मामांच्या मागे राकेश, मग नवखा उमेश, मग अरविंद आणि मी सगळ्यांत शेवटी. पावसामुळे पायाखालची जमीन जबर निसरडी झालेली, पुढे गेलेल्यांमुळे माती आणखीच घसरडी झालेली. उंच खडकांवर चढताना कसरतच करावी लागत होती. बरं, हाताने काही पकड घ्यावी, तर बाजूला होती काटेरी झुडपं आणि ओलं गवत. सरळसोट चढण, पाय चुकून जरी घसरला किंवा हाताची पकड निसटली, तर मागे खोल दरी वाट पाहतच होती. उजवीकडे टाक्‍याचे कातळ... अक्षरशः इंच इंच लढवत आम्ही वर जात होतो. मामा मधूनच धीर देत होते. या वाटेने पुन्हा उतरायचं नाही असं त्यांनी सुरवातीलाच सांगितल्यामुळे आमचं थोडं धैर्य टिकून होतं. चढण फार उंचीची नाही; पण तरी साधारणतः साडेतीनशे फुटांची तरी आहे. वर जाताना खाली पाहणं अर्थातच शक्‍य नव्हतं. या गडबडीत एका खडकाची पकडच मला घेता येईना. पावसामुळे तो ओलाचिंब झाला होताच; शिवाय शेवाळलाही होता. इकडे पायांखालचा दगड निसटू पाहत होता. अखेर जोर लावत पाय उचलत एका मोठ्या झुडपाची पकड घेतली. नेमकं ते काट्याचं झुडूप निघालं. एक काटा बोटात कच्‌कन घुसला, रक्तही वाहायला लागलं, पण झुडपाने आधार दिला; दगा दिला नाही. एकदाचा तो खडक पार केला आणि समोर मल्लिकार्जुनाचं मंदिरच दिसलं... निरव शांततेत देव जणू समाधी लावून बसला होता... आता पुन्हा या वाटेने परतायचं नाही म्हणून आम्ही जल्लोश केला. मंदिर धुक्‍याने वेढलेलं होतं, पण आत पाण्याची कळशी भरलेली होती. तहानेने आम्ही हैराण झालोच होतो; पण देवाला काळजी होती... जरा स्थिरस्थावर झाल्यावर खाली नजर टाकली आणि या वाटेने आपण वर आलो यावर विश्‍वासच बसला नाही... पुन्हा कधी पावसाळ्यात असल्या धोकादायक वाटेने वर यायचं नाही हेही लगेच ठरवून टाकलं.

     बसून भागणार नव्हतं. पाऊस पडायला लागला होता. धुकं दाटायला लागलं होतं. मंदिरासमोरच्या दुसऱ्या वाटेने निघालो. सपाट तळव्याचे माझे बूट उतरताना मला हापटवणार याची भीती असल्याने आधाराला काठी शोधत होतो. पण नाय गावली. उतरून पुन्हा घोणसपूरच्या मंदिरात आलो. क्षणभर टेकून पुन्हा निघालो. दरम्यान मी काठीसाठी मारत असलेल्या आर्त हाकांमुळे द्रवलेल्या मामांनी एक भक्कम वासा माझ्या हाती दिला आणि मग मी रूबाबात निघालो. वाटेत गवा भेटेल याची अपेक्षा होती; पण नाही म्हणजे नाही! फक्त पाऊलखुणा तेवढ्या दिसल्या. येताना उमेशच्या पायाला पुन्हा एक जळू चिकटली. तिला खेचून काढावी लागली. बाकी मंडळी सुरक्षित राहिली. खाली आलो. हातलोट गावातल्या नदीवर मस्त स्वच्छ झालो. मामांनी चहा घेण्याचा आग्रह केला. शेणाने झकास सारवलेल्या जमिनीवर बसून गुळाचा फर्मास चहा ढोसून हुषार झालो. मागे मकरंदगड दिसत होताच. परतीच्या वाटेला लागलो तेव्हा सूर्यदेव डोंगराआड गडप झाले होते. अंधारबन नावाप्रमाणे काळोखलं होतं. मुख्य रस्त्याला लागलो. पाऊस होताच; पण आता डांबरट रस्त्यामुळे काळजी नव्हती.

     गाडी वेगाने धावायला लागली... गडाची ती डेंजर वाट पुन्हा आठवायला लागली... पण आम्ही पुढे जात होतो आणि एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे भासलेला तो मकरंदगड काळोखाच्या पांघरूणात गडप झाला होता...

--अरविंद तेलकर
(Friday, February 12, 2010)
-------------------------------

                (साभार आणि सौजन्य-अरविंद तेलकर.योला साईट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.